मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका हिंदू संघटनेने जाहीर केलेल्या घोषणेमुळे गदारोळ माजला आहे. हिंदू धर्म सेना नावाच्या संघटनेने जाहीर केले आहे की, जर एखाद्या हिंदू मुलाने मुस्लीम मुलीसोबत लग्न केले तर त्याला रुपये ११ हजारांचे बक्षिस देण्यात येईल. संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी ही घोषणा केली असून मुस्लीम युवती आणि हिंदू युवकाच्या प्रेम विवाहाला पाठिंबा देण्यासाठी आपण ही घोषणा केल्याचे त्यांनी सागंतिले. एका हिंदू मुलीने तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन मुस्लीम युवकासोबत लग्न केल्यानंतर तिचे पिंड दान करण्याचा कार्यक्रम हिंदू धर्म सेना या संघटनेने आयोजित केला होता. (हिंदू धर्मात मृत्यूनंतर पिंड दान करण्यात येते) यावेळी सदर घोषणा त्यांनी केली.
हिंदू धर्म सेनेने बक्षिस का जाहीर केले?
योगेश अग्रवाल म्हणाले की, ज्याप्रकारे मुस्लीम युवक हिंदू मुलींना पळवून नेत आहेत. आमच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये अकडवून त्यांचे धर्मांतर करण्यात येते. हा चिंतेचा विषय आहे. आमच्या हिंदू समाजात तसेही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. या गोष्टीला ध्यानात घेऊन हिंदू धर्म सेनेने हा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून हिंदू मुलींचे तर रक्षण करायचे आहेच, त्याशिवाय मुस्लीम मुलींना आपल्याकडे घेऊन यायचे आहे. यासाठी आम्ही हिंदू मुलांना प्रोत्साहित करत असून त्यासाठी रोख अकरा हजारांचे बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू धर्म सेनेच्या या घोषणेनंतर सरकारवर टीका झाली. याबाबत राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, आम्ही याप्रकरणाची चौकशी करू. कोणत्या संघटनेने असा प्रस्ताव दिला आहे, त्याचा तपास केला जाईल.
गुरुवारी (दि. १५ जून) नरसिंगपूर जिल्ह्यात एक आंतरधर्मीय विवाह झाल्यानंतर हा विषय चर्चेत आला. फैजल खान नामक युवकाने हिंदू असलेल्या सोनाली राय या मुलीशी लग्न करण्यासाठी विशेष विवाह कायद्याद्वारे अर्ज केला होता. या जोडप्याच्या विवाहाची पत्रिका त्यांच्या साक्षीदाराच्या नावासह सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर हिंदू संघटनांनी या जोडप्याचा आणि त्यांच्या साक्षीदारांची शोकसभा आयोजित करण्याची धमकी दिली. या धमकीनंतर फैजल खान याने सोनाली रायशी लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला, अशी माहिती इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिली आहे.
या प्रकरणावर टीका करताना काँग्रेसचे भोपाळचे आमदार आरिफ मसूद म्हणाले, “हा देश संविधानावर चालतो. आंतरधर्मीय विवाहासाठी आपल्याकडे कायदे केलेले आहेत. तुम्ही लोकांना प्रेमात पडण्यापासून रोखू शकत नाहीत. पण जेव्हा एखाद्या विशिष्ट समाजाशी निगडित विषय येतो, तेव्हा त्याला लव्ह जिहाद अशी संज्ञा वापरली जाते. पण जेव्हा हाच प्रकार हिंदू धर्म सेनेसारख्या संघटनाकडून करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.”