मध्य प्रदेशात पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा १२०० हून अधिक खेड्यांना फटका बसला आहे. विशेष म्हणजे या पूरपरिस्थितीमध्ये गावकऱ्यांच्या मदतीला गेलेल्या चौहान सरकारमधील एका मंत्र्यालाचा एअरलिफ्ट करण्याची वेळ आली.
पाहा फोटो >> Photos: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या गृहमंत्र्यांनाच जेव्हा हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट केलं जातं
झालं असं की, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दतिया जिल्ह्यात गेले होते. पूराचा सर्वाधिक फटका दतिया जिल्ह्याला बसला आहे. गृहमंत्री येथील गावांमध्ये अडकलेल्यांच्या मदतीला गेलेले असतानाच पुराचं पाणी वाढलं आणि ते एका घराच्या गच्चीवर अडकले. अखेर भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मिश्रा यांना एअरलिफ्ट केलं.
Madhya Pradesh Home Minister @drnarottammisra was airlifted during flood relief and rescue operation at Datia. He had gone to meet the people who had been stranded pic.twitter.com/NbfwtkiPdU
— Neelam Pandey (@NPDay) August 4, 2021
१९५० लोक अजूनही पूरग्रस्त भागांमध्ये अडकून पडलेत
५९५० लोकांना लष्कर, एनडीआरएफ, सीमा सुरक्षा दल व राज्य यंत्रणांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी दिली. १९५० लोक अजूनही पूरग्रस्त भागांमध्ये अडकून पडले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाच्या प्रकोपामुळे शिवपुरी व ग्वाल्हेरदरम्यानची रेल्वे सेवा आणि मुरैना जिल्ह्यातील दूरसंचार सेवा ठप्प झाल्या आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. मंगळवारी खराब हवामानामुळे प्रभावित झालेले बचावकार्य बुधवारी हेलिकॉप्टरच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात आले.
Madhya Pradesh Home Minister Narottam Mishra was airlifted after he got stuck at a flood-affected village in Datia district where he had gone to help stranded people yesterday pic.twitter.com/yTXjj7HjZv
— ANI (@ANI) August 4, 2021
१२२५ खेडी प्रभावित
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारी पूरग्रस्त भागांचा हवाई दौरा केला. ‘उत्तर मध्य प्रदेशातील पूरस्थिती गंभीर आहे. शिवपुरी, दतिया, ग्वाल्हेर, गुणा, भिंड व मुरैना जिल्ह्यांतील १२२५ खेडी प्रभावित झाली आहेत,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “२४० खेड्यांतील ५,९५० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात राज्य आपदा प्रतिसाद दल राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल (एनडीआरएफ), लष्कर व सीमा सुरक्षा दल यांना यश आले आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
#WATCH | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan also took stock of two collapsed bridges following heavy rains on Datia-Gwalior road, Datia during his aerial survey earlier in the day. pic.twitter.com/SatTecpboc
— ANI (@ANI) August 4, 2021
पुलाला भेगा पडल्याने खबरदारी म्हणून बंद
शिवपुरी जिल्ह्यातील काही खेडी पूर्णपणे पाण्याखाली गेली होती, मात्र तेथे अडकलेले लोक सुरक्षित आहेत. दतिया जिल्ह्यातील ३६ खेड्यांतून ११०० लोकांची लष्कराने सुटका केली. पुरामुळे सर्व मुख्य रस्ते बंद झालेल्या दतिया जिल्ह्यातील एका ठिकाणावरून काही लोकांना हवाई मार्गाने इतरत्र हलवण्यात आले. दतिया जिल्ह्यातील २ पूल पुरामुळे कोसळले. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील एका पुलाला भेगा पडल्याने खबरदारी म्हणून तो बंद करण्यात आला आहे, असे चौहान म्हणाले. ग्वाल्हेर जिल्ह्यातील ४६ खेड्यांना पुराचा फटका बसला असून, तेथील सुमारे ३ हजार लोकांना ग्वाल्हेरमधील मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले. शिवपुरीच्या २२ खेड्यांमधील ८०० लोकांची सुटका करण्यात आली.