Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result Updates पाच राज्यांच्या निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलं असून आता संपूर्ण देशाला या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी मतदान झालं आहे. सरकार स्थापनेसाठी ११६ आमदारसंख्या हवी आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे तीन दिवसांत कळेल. तत्पूर्वी अनेक वृत्तसंस्था आणि खासगी कंपन्यांनी त्यांचे एग्झिट पोल जाहीर केले आहेत. मध्य प्रदेश निवडणुकीबाबतचे चार महत्त्वाचे एग्झिट पोल हाती आले असून त्यापैकी तीन पोल्समध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जन की बात, टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्ट, रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिज आणि दैनिक भास्करच्या एग्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची झुंज पाहायला मिळणार आहे. यापैकी रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिजच्या एग्झिट पोलमध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर इतर तीन एग्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.

‘जन की बात’च्या एग्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला १०० ते १२३ जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला १०२ ते १२५ जागा मिळू शकतात. टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार्टच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला १११ ते १२१ जागा आणि भाजपाला १०६ ते ११६ जागा मिळू शकतात. रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिजच्या सर्वेक्षणानुसार भाजपाला ११८ ते १३० जागा आणि काँग्रेसला ९७ ते १०७ जागा मिळू शकतात. दैनिक भास्करच्या एग्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपाला ९५ ते ११५ जागा आणि काँग्रेसला १०५ ते १२० जागा मिळू शकतात.

हे ही वाचा >> Rajasthan Exit Poll : काँग्रेसला इतिहास रचण्याची संधी? ‘या’ एग्झिट पोलने सगळ्यांनाच केलं चकित

कोणत्याही पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही पक्ष बहुमताच्या अगदी जवळ पोहोचत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात अगदी थोड्या फरकाने पक्ष सत्तेवर येईल. कदाचित अपक्ष आणि इतर पक्षांच्या दोन-तीन जागादेखील निर्णायक ठरू शकतात. मध्य प्रदेश विधानसभेत सध्या तीन अपक्ष आमदार आहेत. तर एक आमदार बहुजन समाज पार्टीचा आहे. सध्या विधानसभेत भाजपाकडे १२८ तर काँग्रेसकडे ९८ आमदार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhya pradesh legislative assembly election 2023 all exit polls asc