Madhya Pradesh : गेल्या काही महिन्यांत रेल्वे अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये कधी रेल्वे अपघात तर कधी रेल्वेने प्रवास करताना एखाद्या व्यक्तीचा अपघात. यासंदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालेले आहेत. याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती मोहीमही राबवली जाते. मात्र, तरीही लोक त्याबाबत गांभीर्य दाखवत नाहीत. आताही अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील जबलपूरमध्ये घडली आहे. एका तरुणाने ट्रेनच्या बोगीखाली चाकांजवळ लटकून प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूर येथे दानापूर एक्स्प्रेसच्या डब्याखाली चाकांजवळ लटकून प्रवास करत असलेल्या एका व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीने तब्बल इटारसी ते जबलपूर म्हणजे जवळपास २९० किलोमीटरचा प्रवास हा ट्रेनच्या बोगीखाली चाकांजवळ लटकून केला. मात्र, जबलपूर रेल्वे स्थानकावर रेल्वेचे कर्मचारी या रेल्वेची काही तांत्रिक तपासणी करत असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला.
यावेळी त्यांना रेल्वेच्या एस-४ डब्याखाली एक व्यक्ती चाकांजवळ लटकून प्रवास करत असल्याचं आढळलं. हा प्रकार पाहून कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. यानंतर त्या व्यक्तीला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आणि त्याची चौकशी केली असता तो इटारसी रेल्वे स्थानकापासून बसल्याची माहिती त्याने दिली. दरम्यान, या व्यक्तीला रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आरपीएफच्या ताब्यात दिले असल्याची माहिती सांगितली जाते. यासंदर्भातील वृत्त फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे.
ट्रेन के पहियों के पास लेटकर 290 किलोमीटर तक किया सफर
— suman (@suman_pakad) December 27, 2024
मामला मध्य प्रदेश के जबलपुर का है #Railway #MadhyaPradesh pic.twitter.com/eTVwHSfKBr
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
suman_pakad या एक्स हँडलवर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. यामध्ये युजरने कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे की, एका व्यक्तीने ट्रेनच्या चाकांजवळ बसून तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास केला. तसेच या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ट्रेनच्या बोगीखाली चाकांजवळ बसलेली दिसत आहे. मात्र, रेल्वे कर्माचाऱ्यांच्या निदर्शनात आल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी त्या व्यक्तीला बाहेर काढत असल्याचं दिसत आहेत. या घटनेचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.