Kailash Vijayvargiya on Kalimuddin: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मध्य प्रदेशात जंयती साजरी करत असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केलेले एक विधान सध्या चर्चेत आहे. इंदूर येथे मराठी संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले, “आज हिंदू धर्म अबाधित आहे, माझे नाव कैलाश आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण माळवा, छत्तीसगडमध्ये मुघलांना घुसू दिले नाही. नाहीतर माझे नावही कैलाशच्या ऐवजी कलीमुद्दीन झाले असते.”
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेल्या कैलाश विजयवर्गीय यांनी पुढे म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माची रक्षा करण्यासाठी सेना उभी केली. त्यांच्या मुठभर सैनिकांनी लाखोंच्या सेनेला पराभूत केले.
कैलाश विजयवर्गीय पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सनातन धर्माची रक्षा केली. म्हणूनच या प्रांतात मुघलांचा शिरकाव झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर ब्रिटिश भारतात आले. महाराज असताना ब्रिटिशांनाही इथे येता आले नसते. हिंदू समाज शिवाजी महाराजांचा कृतज्ञ आहे.
भाजपाचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय
कैलाश विजयवर्गीय हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेली विधाने ही नेहमीच चर्चेत असतात. मध्य प्रदेशसह ते बाहेरच्या राज्यांमध्येही प्रसिद्ध आहेत. पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रभारी पद त्यांनी अनेक वर्ष सांभाळले होते. नगरसेवक पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. त्यानंतर ते खासदार ते राष्ट्रीय सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले. त्यांना मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही मानले जात होते.