दारूचं व्यसन आणि दारूबंदी या दोन्ही गोष्टी नेहमीच चर्चेत येत असतात. एकीकडे दारूचं व्यसन कसं सोडवावं? हा प्रश्न असताना दुसरीकडे दारूबंदी कशी लागू करता येईल? यावर चर्चा चालू असते. त्याचवेळी लागू असलेली दारूबंदी यशस्वी कशी करता येईल? हा प्रश्नही प्रसासनासमोर उभा असतो. अनेक ठिकाणी दारूबंदी लागू असतानाही तिचं पालन केलं जात नाही. उलट दारूबंदी असलेल्या ठिकाणी सर्वाधिक प्रमाणात आणि सर्वाधिक दराने दारूविक्री होते, असेही दावे केले जातात. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय व कल्याण मंत्री नारायण सिंह कुशवाहा यांनी राज्यातील महिलांना दिलेला सल्ला चर्चेत आला आहे.
काय म्हणाले नारायण सिंह कुशवाहा?
नारायण सिंह कुशवाहा यांनी राज्यात दारूच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी, पुरुषांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी एका कार्यक्रमादरम्यान एक सल्ला दिला आहे. या कार्यक्रमातला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारण मंत्री नारायण सिंह कुशवाहा यांनी महिलांना त्यांच्या नवऱ्यांना घरी येऊन दारू पिण्याचा आग्रह धरण्याचा सल्ला दिला आहे.
“दारू घरी घेऊन या, घरी प्या”
“सध्या दारू बंद आहे. पण पिणारे ऐकत नाहीत. अजूनही पीत आहेत. पण दारूबंदीच्या उपक्रमात घरातल्या महिलांचं मोठं योगदान असेल. घरातल्या महिलांनी जर नवऱ्याची दारू बंद करायचं ठरवलं तर त्या हे साध्य करू शकतात. आधी तर त्यांनी नवऱ्यांना सागायला हवं की तुम्ही बाहेर कुठेच दारू पिऊ नका. तुम्ही दारू घरी घेऊन या, जेवण करा आणि माझ्यासमोर प्या”, असं नारायण सिंह कुशवाहा म्हणाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.
असा सल्ला देण्याचं कारण काय?
दरम्यान, त्यांच्या या सल्ल्याची चर्चा होत असताना त्याच व्हिडीओमध्ये पुढे त्यांनी असा सल्ला देण्यामागचं कारण दिलं आहे. “तुमच्यासमोर दारू प्यायले तर त्यांचं दारू प्यायचं प्रमाण कमी होत जाईल. हळूहळू ते बंद होण्याच्या दिशेने जाईल. त्यांना याची लाज वाटेल की मी माझ्या पत्नी किंवा मुलांसमोर दारू पीत आहे. त्यांना महिलांनी हेही सांगायला पाहिजे की तुमची मुलं पुढे जाऊन दारू पिऊ लागतील आणि त्यांचे पुढे काय हाल होतील. असं केलं तर त्यांची दारू पूर्णपणे बंद होईल हे निश्चित आहे. या सगळ्यामध्ये महिलांचं मोठं योगदान असेल”, असं नारायण सिंह कुशवाहा म्हणाले.
काँग्रेस म्हणते, “त्यांचा हेतू चांगला, पण…”
नारायण कुशवाहा यांच्या विधानावर काँग्रेसनं टीका करतानाच त्यांच्या हेतूचं समर्थनही केलं आहे. “नारायण कुशवाहा यांच्या विधानामागचा हेतू चांगला आहे. पण ते सांगण्याची त्यांची पद्धत चुकली. घरात दारू पिणं हे घरातील आगामी वादांसाठी आमंत्रण ठरेल. त्यातून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही वाढू शकतात. त्यांनी लोकांना फक्त दारू न पिण्याचं आवाहन करायला हवं होतं”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या राज्यातील मीडिया सेलचे अध्यक्ष मुकेश नायक यांनी दिली.