नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना बुधवारी इंदौर हायकोर्टाने जामीन मंजूर केला. सरकारी कामात अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी मेधा पाटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मध्य प्रदेशमधील चिखलदा येथे नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी २७ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाप्रकरणी मेधा पाटकर यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेधा पाटकर यांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर सरकारी अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी मेधा पाटकर यांना सत्र न्यायालयाने जामीन नाकारला होता. शेवटी मेधा पाटकर यांनी इंदौर हायकोर्टात जामीन अर्ज केला होता.

इंदौर हायकोर्टात बुधवारी झालेल्या सुनावणीत मेधा पाटकर यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे धारमधील तुरुंगात असलेल्या मेधा पाटकर यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यान मेधा पाटकर यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर विश्वास नसलेल्यांनी महात्मा गांधींच्या स्वप्नांचीही हत्या केली अशी टीका त्यांनी केली होती.