मध्य प्रदेशमध्ये नवीन वर्षाची सुरुवात वादाने झाली असून महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयात ‘वंदे मातरम’ म्हणण्याची भाजपा सरकारच्या काळात सुरु झालेली परंपरा काँग्रेस सरकारने बंद केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले असून एक दिवस वंदे मातरम म्हटले नाही म्हणून तो व्यक्ती देशभक्त ठरत नाही का?, असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशमध्ये भाजपा सरकारच्या काळात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयांमध्ये वंदे मातरम म्हणणे बंधकारक करण्यात आले होते. मात्र, आता मध्य प्रदेशमध्ये सत्ता बदल झाला असून राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. 1 जानेवारी रोजी सरकारने सरकारी कार्यालयांमधील वंदे मातरम बंधनकारक नसेल, असे सांगितले आणि गेल्या 10 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा बंद झाली. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले.

माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसने ही प्रथा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी केली आहे. तर भाजपाच्या अन्य नेत्यांनी काँग्रेसचा हा अजेंडा असल्याचा आरोप केला. तर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. ‘आम्ही या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. आमचा वंदे मातरमला विरोध नाही. आम्ही लवकरच हा नियम पुन्हा लागू करु, फक्त नव्या स्वरुपात याची अंमलबजावणी केली जाईल’, असे त्यांनी सांगितले. फक्त एक दिवस वंदे मातरम म्हटल्याने कोणीही देशभक्त ठरत नाही, असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे.