Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील सिधी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातवाने आधी पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:चंही जीवन संपवलं. मात्र, या घटनेमुळे हळहळलेल्या आजोबांनीही पेटत्या चितेत उडी घेऊन जीवन संपवलं. या हृदयद्रावक घटनेमुळे सिधी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रिपोर्टनुसार, सिधी जिल्ह्यातील बहरी पोलीस स्टेशन क्षेत्रातील सिहोलिया गावात ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३४ वर्षीय अभयराज यादव या व्यक्तीने त्याची पत्नी सविता यादव हिची कुऱ्हाडीने हत्या केली आणि त्यानंतर स्वतः ही गळफास घेऊन जीवन संपवलं, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक गायत्री त्रिपाठी यांनी दिली. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
ही घटना घडल्यानंतर नातू आणि नातवाच्या पत्नीवर अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर आजोबा रामावतार यादव घरीही गेले. पण ते त्यानंतर अचानक बेपत्ता झाले. आजोबा बेपत्ता झाल्याने गावकऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर शनिवारी सकाळी बेपत्ता आजोबांचा अर्धवट जळालेला मृतदेह ज्या ठिकाणी नातू आणि सुनाचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते त्या ठिकाणी आढळून आला.
दरम्यान, अभयराजने त्याच्या पत्नीची हत्या का केली? यामागचं कारण याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पण अभयराज आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर ही संपूर्ण घटना पाहून अभयराजचे आजोबा रामावतार यादव हे मानसिकदृष्ट्या खचले होते. त्यानंतर त्यांना दु:ख सहन न झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असं सांगितलं जात आहे.
बाहेरी पोलीस स्टेशनच्या डीएसपींनी सांगितलं की, ‘रामावतार यादव यांना त्यांच्या नातवाच्या मृत्यूने धक्का बसला होता. शनिवारी सकाळी त्यांचा जळालेला मृतदेह चितेवर सापडला आढळून आला आहे. तसेच आजोबाच्या नातवाने त्याच्या पत्नीची हत्या का केली? याचं कारण अद्याप सध्या समजू शकलेली नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे’, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.