मध्य प्रदेशच्या हरदा येथे बुधवारी झालेल्या दुहेरी भीषण अपघातासारखे प्रकार क्वचितच घडतात, अशी प्रतिक्रिया अपघाताच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या रेल्वे बोर्डाच्या पथकाने दिली आहे. या पथकासोबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही या ठिकाणाची पाहणी केली होती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांशी निगडीत व्यवस्था सांभाळणारे वरिष्ठ अधिकारी व्ही.के.गुप्ता यांनी अपघातस्थळी जाऊन तांत्रिक गोष्टींची पाहणी केली.
मध्य प्रदेशात झालेल्या दुहेरी अपघातासारखे प्रकार घडण्याची शक्यता फार कमी असते, असे अपघात क्वचितच घडतात. मुसळधार पाऊस झाल्याने पाण्याची पातळी चार मीटरहून अधिक झाली होती. ही पातळी रेल्वेरुळांसाठी धोकादायक होती, असे गुप्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
सदर पुलाचे बांधकामाचा दर्जा देखील योग्य होता. मात्र, अशा प्रकारचा पूर पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत एकदाच येतो, असेही ते पुढे म्हणाले.
अपघात घडण्याच्या संभाव्य ठिकाणांची यादी स्थानिक रेल्वे प्रशासनाकडे होती. अशा ठिकाणांवर चालकासाठी वेगमर्यादा घालून देण्यात आलेली असते. तसेच वेळोवेळी या ठिकाणांची पाहणी देखील केली जाते. मात्र, या यादीत अपघात घडलेल्या ठिकाणाचा समावेश नव्हता, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए.के.मित्तल यांनी सांगितले आहे.

Story img Loader