Madhya Pradesh liquor ban : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गुरुवारी (23 जानेवारी) १७ शहरांमध्ये मद्यविक्री बंदीची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेश राज्यातील १७ शहरात देशी किंवा विदेशी कोणत्याही प्रकारची दारू मिळणार नाही. तसेच ज्या आधारावर आम्ही आमचं सरकार चालवण्याचा निर्णय घेतला, ते आमचे संकल्प पूर्ण करत असल्याचं मोहन यादव यांनी म्हटलं आहे. तसेच मध्य प्रदेश सरकार आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव हे मध्य प्रदेशात हळूहळू संपूर्ण राज्यात मद्यविक्री बंदी संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण याबाबतचे संकेतही मोहन यादव यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं की, “मला खात्री आहे की संपूर्ण राज्य हळूहळू मद्यविक्रीबंदीकडे जाईल. आता आम्ही पहिल्या टप्प्यात १७ धार्मिक क्षेत्र असलेल्या शहरांतील नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायतीमध्ये मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे”,असं मोहन यादव यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर दिलं आहे.

दरम्यान, “या १७ शहरांतील ही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा कधीही सुरु होणार नाहीत. तसेच दुसरीकडे स्थलांतरीत देखील करण्यात येणार नाहीत. आता ही मद्यविक्रीची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण समाजात अमली पदार्थांच्या सेवनाची सवय देशोधडीला लावत आहे. दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत आणि होत आहेत. त्यामुळे ही मोठी वेदना आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आमच्या सरकारने ठराव केला आहे की सरकारच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील १७ धार्मिक शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात दारू बंदी करण्यात येणार आहे”, असंही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

“तसेच २०२८ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरीबाला कायमस्वरूपी घर मिळण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या सरकारने या दिशेने काम करण्याचा संकल्प केला आहे. आमच्या सरकारने महिला,गरीब, तरुण आणि शेतकरी या सर्व घटकांकडे लक्ष देण्याची मोहीम सुरू केली आहे. तसेच आम्ही गरीब कल्याण यासह विविध मोहिमा राज्यात राबवत आहोत”, असंही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी स्पष्ट सांगितलं.

Story img Loader