तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात न्यायालयाने सुनावणी १० मार्चपर्यंत लांबणीवर टाकली आहे.
मुख्य सत्र न्यायाधीश न्या. एन. अधिनाथन यांनी करुणानिधी त्यांच्या वकिलांसह व्हीलचेअरवर उपस्थित राहिल्याची एक मिनिटात नोंद घेतली व सुनावणी लांबणीवर टाकली. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन व कन्या राज्यसभा खासदाप कनिमोळी यांच्यासह टी. आर. बाळू, दयानिधी मारन, दुरायमुरुगन व अरकॉट वीरस्वामी या वेळी उपस्थित होते. न्यायालयात द्रमुकचे १५०० कार्यकर्ते व द्रमुकचे वकील उपस्थित होते, त्यामुळे पोलिसांना गर्दी आवरणे कठीण गेले. मुख्य न्यायाधीश एन. अधिनाथन यांनी गेल्या महिन्यातील सुनावणीच्या वेळी करुणानिधी यांना १८ जानेवारी रोजी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. अद्रमुकच्या चार वर्षांच्या राजवटीबाबत नोव्हेंबरमध्ये द्रमुकच्या मुरासोली या मुखपत्रात जो मजकूर प्रसिद्ध झाला आहे त्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांनी करुणानिधी यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. न्यायालयाने मुरासोलीचे संपादक, मुद्रक व प्रकाशक एस. सेल्वम यांनाही हजर राहण्याचा आदेश दिला होता. करुणानिधी यांनी त्यांच्या लेखात आनंद विकटन या तामिळ पाक्षिकातील लेखाचा दाखला दिला असून, त्यात जयललिता यांच्या राजवटीवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा