महाविद्यालये व इतर शिक्षण संस्था, तसेच इतर विद्यापीठांमध्ये सौंदर्य स्पर्धा घेण्यास तामिळनाडूतील मद्रास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. राज्य सरकारने सौंदर्य स्पर्धावर बंदी घालणारे परिपत्रक जारी करावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
न्या. टी.एस. शिवागननाम यांनी सांगितले की, लक्ष्मी सुरेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा अंतरिम आदेश देण्यात येत आहे. रॅम्पवर चालण्याने इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना काय फायदा मिळणार आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
न्यायालयाने उच्च शिक्षण सचिव व तंत्रशिक्षण सचिव यांना परिपत्रक जारी करण्यास सांगितले असून विद्यापीठे. अभिमत विद्यापीठे व महाविद्यालये येथे सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यावर बंदी घालण्याचे त्यात नमूद करावे असे म्हटले आहे.
याचिकाकर्त्यां लक्ष्मी सुरेश यांनी म्हटले आहे की, आपली मुलगी अभियांत्रिकी विद्यार्थी  असून तिने ‘मिस टेकोफेस काँटेस्ट’ या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता. अण्णा विद्यापीठाच्या गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा घेतली गेली. त्यात मुलीला ठरलेली पारितोषिके विजेती ठरूनही मिळाली नाहीत व प्रमाणपत्रावर बनावट सह्य़ा होत्या. त्यामुळे अधिष्ठाता, अभियांत्रिकी महाविद्यालय, अण्णा विद्यापीठ, विद्यार्थी संघटना, आर्ट्स सोसायटी, टेकोफेसचे आयोजक यांना नोटिसा द्याव्यात व जाहीर केल्याप्रमाणे पारितोषिके न दिल्याबदद्ल आपल्या मुलीला पाच लाखांची भरपाई देण्यात यावी. यात मानवाधिकारांचे उल्लंघन झाले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, विद्यापीठाने प्रतिज्ञापत्र दाखल करावे. आता या प्रकरणी २० फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madras high court bans beauty contests in colleges in tamil nadu