मद्रास उच्च न्यायालयाची शिफारस
बाललैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना नपुंसक करावे, अशी शिफारस सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाने केली. रानटी स्वरूपाच्या गुन्ह्य़ांसाठी तशाच पद्धतीची शिक्षा हवी असे मत न्यायालयाने नोंदविले.
न्या. एन. किरुबकरन यांनी ब्रिटनच्या एका नागरिकाविरुद्ध आदेश देताना केंद्र सरकारला वरील शिफारस केली. आरोपीला नपुंसक केल्यास बाललैंगिक शोषणाच्या प्रकारांना आळा घालण्याच्या प्रकारात लक्षणीय घट होईल, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांसाठी कठोर शिक्षा देण्यास कायदा असमर्थ आणि अपरिणामकारक असेल तर न्यायालय हाताची घडी घालून स्वस्थ बसू शकत नाही. लहान मुलांवर सामूहिक बलात्कार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, असेही ते म्हणाले. शाळांमध्ये लैंगिक शिक्षण शिकविण्याच्या पर्यायाचाही सरकारने गांभीर्याने विचार करावा, असेही न्या. किरुबकरन यांनी म्हटले आहे.
युवकांना योग्य आणि शास्त्रोक्त माहिती मिळत नसल्याने ते माहितीचे महाजाल, मित्रपरिवार आणि चित्रपट यामधून अयोग्य माहिती मिळवितात, असेही ते म्हणाले.