बुद्ध पौर्णिमेला सरकारी सुट्टी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. अशी मागणी भगवान बुद्ध यांनीही मान्य केली नसती, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.
हेही वाचा – दुबईला जाणाऱ्या विमानाला चिमणीची धडक, दिल्ली विमानतळावर अलर्ट घोषित, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण
याचिकेत नेमके काय म्हटलेय?
‘जनसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार, तामिळनाडूच्या विरुधुनगर येथील रहिवासी एमसी पांडियाराज यांनी बुद्ध पौर्णिमेला सुट्टी द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयाकडे केली होती. भारत आणि श्रीलंकेसह अनेक आशियाई देशांमध्ये बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारला द्यावेत, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली.
उच्च न्यायालय नेमके काय म्हणाले?
दरम्यान, शुक्रवारी या याचिकेवर न्यायमूर्ती टी राजा आणि न्यायमूर्ती डी. भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने ही याचिक फेटाळून लावली. बुद्ध पौर्णिमेला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असे निर्देश न्यायालय देऊ शकत नाही. मुळात अशी मागणी भगवान बुद्ध यांनीही मान्य केली नसती. माझ्या जयंतीला शाळा आणि सरकारी कार्यालये बंद ठेवा, असे गौतम बुद्ध यांनी कधीही सांगितले नव्हते, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले.
हेही वाचा – हैदराबादमधील चारमिनार येथे दोन गटांत राडा, मशिदीसमोर स्टंटबाजी केल्याने झाला होता वाद; VIDEO समोर
‘या’ देशांमध्ये बुद्ध पौर्णिमेला सुट्टी
पूर्व आशियातील कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलंडसह अनेक देशांमध्ये गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बौद्ध भिक्षू बौद्ध विहारात जाऊन गौतम बुद्ध यांचे स्मरण करतात. तसेच काही ठिकाणी शोभायात्रादेखील काढण्यात येते.