Madras High Court Hearing Sexual Assault Case: मद्रास उच्च न्यायालयाने एका लैंगिक अत्याचाराच्या खटल्याची सुनावणी करताना स्पष्ट केले की, प्रेम करणाऱ्या तरुण-तरुणींनी एकमेकांच्या गळ्यात पडणे, चुंबन घेणे यासारख्या गोष्टी स्वाभाविक आहेत. नुकतेच एका तरुणाविरुद्ध चालू असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने हे मत मांडले. यावेळी न्यायालयाने आरोपी तरुणाला दिलासा देत त्याच्याविरोधातील लैंगिक अत्याचाराचा खटला रद्द करण्याचे आदेश दिले.
‘लाईव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती आनंद व्यंकटेश म्हणाले, “भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अ नुसार लैंगिक अत्याचार झाला असे म्हणण्यासाठी ‘पुरुषाचा महिलेशी शारीरिक संबंध येणे आवश्यक आहे, ज्यामध्ये स्पष्ट लैंगिक क्रियेचा समावेश असावा लागतो. त्यामुळे चुंबन घेणे लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत येत नाही.”
काय आहे प्रकरण?
संथनगणेशन नामक व्यक्तीकडून न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या कलम ३५४ अंतर्गत गुन्ह्यातून सुटका मिळावी, अशी मागणी संथनगणेशननं याचिकेत केली होती. याचिकाकर्त्यावर आरोप होता की, त्याचे पीडित तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्याने १३ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तरुणीला भेटायला बोलावले होते. तेथे आरोपीने पीडित तरुणीशी बोलत असताना तिला मिठी मारत चुंबन घेतल्याचा आरोप तरुणीने केला होता. त्यानंतर पीडित तरुणीने या घटनेची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली आणि आरोपीने आपल्याशी लग्न करावं अशी मागणी केली. जेव्हा आरोपीने लग्नास नकार दिला तेव्हा तिने त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली.
आणखी पाहा: अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
न्यायालय काय म्हणाले?
हा खटला रद्द करताना मद्रास उच्च न्यायालय म्हणाले, “आरोपीविरोधात केलेले आरोप मान्य जरी केले तरी, त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे अशात आरोपीविरोधात कारवाई सुरू ठेवणे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग ठरेल.” खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी असे निरीक्षण नोंदवले की, “तरुण मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची प्रेमाची भावना सामान्य आहे. त्यामुळे त्यांनी एकमेकांना मिठी मारणे, चुंबन घेणे अगदी स्वाभाविक आहे. या आधारावर आरोपीने केलेले कृत्य कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे याला गुन्हा ठरवता येणार नाही.” यावेळी मद्रास उच्च न्यायालयाने आरोपी संंथनगणेशन याच्याविरोधातील सर्व न्यायालयीन कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.