भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते येथील एका मदरशाचे उद्घाटन करण्याच्या प्रस्तावामुळे मुस्लीम समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून हा कार्यक्रम रद्द करण्याची आग्रही मागणी होऊ लागली आहे.
मदरशाचे उद्घाटन जोशी यांच्या हस्ते करण्याच्या प्रस्तावामुळे मुस्लीम समाज नाराज झाला आहे. आपण शहरातील काझींची भेट घेऊन यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, मात्र अद्याप या कार्यक्रमात बदल करण्यात आलेला नाही, असे मदरशाचे प्रमुख मोहम्मद मेहराज यांनी सांगितले.
अल जमिआत-उल-नूरिया मदरसा जोशी यांच्या मतदारसंघातील श्यामनगर येथे आहे आणि त्याचे नूतनीकरण करण्यात येत असून बांधकाम जानेवारी महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
एका मुस्लीम गटाने आपली भेट घेतली आणि सदर प्रस्तावाला जोरदार हरकत घेतली. बाबरी मशीद पाडण्यास जोशी यांचा पक्ष कारणीभूत आहे. मदरशांमधून दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे वक्तव्य याच पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी केले होते, असे या गटाचे म्हणणे आहे, असे मेहराज म्हणाले.