भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी समाजवादी पक्षावर टीका केलीय. उत्तर प्रदेशमध्ये माफिया हे तुरुंगामध्ये किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवारांच्या यादीत आढळतील, असा टोला अमित शाह यांनी लगावलाय.
अतराऊली येथील सार्वजनिक सभेमध्ये बोलताना शाह यांनी समाजवादी पक्षावर टीका केली. “तुम्ही उत्तर प्रदेशमधील माफियांचा शोध घेतला तर ते केवळ तीनच जागी दिसतील. त्या जागामध्ये तुरुंग, उत्तर प्रदेशच्या बाहेर आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवार यादीचा समावेश आहे,” असं अमित शाह म्हणालेत.
समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका करताना भाजपाच्या माजी पक्षाध्यक्षांनी, “बहनजी (मायावती) आणि अखिलेश (यादव) सत्तेत आल्यास उत्तर प्रदेशच्या लोकांना हे गुंड छळतील,” असंही म्हणाले. यावेळी शाह यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुकही केलंय. “उत्तर प्रदेशमध्ये पोलीस आधी माफियांना घाबरायचे. आता योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली माफिया उत्तर प्रदेशच्या बाहेर गेले आहेत,” असं शाह म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान १४ फेब्रुवारी रोजी होईल. तिसऱ्या टप्पा २० फेब्रुवारी, चौथा २३ आणि पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. अंतिम दोन टप्पे ३ मार्च आणि सात मार्च रोजी पार पडणार आहेत. मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे.