मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसाचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे भारतात बहुतांश राज्यांत बंदी घालण्यात आलेल्या नेस्ले कंपनीच्या ‘मॅगी’च्या मागचे शुक्लकाष्ठ लांबत चालले आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातून आयात होणाऱ्या मॅगी नूडल्सवर बंदी घातली आहे. तामिळनाडूमध्ये एक मुलगा मॅगी खाऊन आजारी पडल्यामुळे विक्रेत्याकडील मॅगीची ७०० पाकिटे जप्त करण्यात आली. इकडे भारतातील ‘मॅगी’चा साठा नष्ट करण्यासाठी नेस्ले इंडियाला ३२० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
अन्नविषयक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाने भारतातून होणाऱ्या मॅगी नूडल्सची आयात तात्पुरती थांबवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलियाच्या शेतकी विभागाने मॅगीविरुद्ध ११ जूनपासून ‘थांबवा’ आदेश (होल्डिंग ऑर्डर) काढला आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील अन्न दर्जा संहितेमध्ये (फूड स्टँडर्ड्स कोड) परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा त्यात शिसाचे प्रमाण अधिक असल्याच्या बातम्यांमुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. ‘होल्डिंग ऑर्डर’नुसार शेतकी खाते मॅगीच्या संपूर्ण साठय़ाची चाचणी व परीक्षण करेल. प्राधिकृत अधिकाऱ्याने परीक्षण किंवा विश्लेषण करेपर्यंत मॅगीची आयातीत पाकिटे एका ठिकाणी साठवली जातील आणि परीक्षणानंतरच त्याच्या दर्जाबाबत मंजुरी दिली जाईल.
‘इन्स्टंट स्नॅक’ म्हणून लोकप्रिय असलेली मॅगी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्याही रडारवर आली आहे. त्याच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच चाचणीसाठी मॅगीचे नमुने घेतले आहेत.
तामिळनाडूतील कडालूरमध्ये पाकिटातील मॅगी खाल्ल्यानंतर दहा वर्षे वयाच्या एका मुलाची तब्येत बिघडल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्याकडील मॅगीची सर्व, म्हणजे सातशेहून अधिक पाकिटे जप्त केली. पाचवीचा विद्यार्थी असलेल्या एस. अरुण कुमार याने रविवारी रात्री जेवणात मॅगी खाल्ल्यानंतर त्याला उलटय़ा व चक्कर यांचा त्रास होऊ लागला. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संबंधित विक्रेत्याकडील मॅगीची ७१४ पाकिटे जप्त केली.
दरम्यान, भारतातील अन्न सुरक्षेचे नियमन करणाऱ्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) या संस्थेने मॅगीवर बंदी घातल्यामुळे नेस्ले इंडिया कंपनीने देशभरातील मॅगी इन्स्टंट नूडल्सची ३२० कोटी रुपयांची पाकिटे नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. बाजारपेठा, कारखाने आणि वितरक यांच्याकडील मॅगीचा साठा परत मागवून नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा