मॅगी न्यूडल्स खाण्यासाठी सुरक्षित असून, उत्पादनाच्या दर्जालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असते, असे नेसलेचे आंतराष्ट्रीय सीईओ पॉल बुल्क यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आल्यावर विविध राज्यांनी मॅगीच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. या पार्श्वभूमी पॉल बुल्क यांनी लोकांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण असल्यामुळे कंपनीने देशभरातून मॅगी परत मागविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम कंपनी करेल आणि लवकरात लवकर मॅगी पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मॅगी न्यूडल्सच्या मसाल्यामध्ये आम्ही मोनोसोडियम ग्लुटामेट घालत नाही, असेही त्यांनी सांगितले. लवकरच उत्पादनावर त्यासंबंधीची माहिती असणारे स्टिकर लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशभरातून मॅगी न्यूडल्स परत घेण्याचा निर्णय गुरुवारीच कंपनीने घेतला आहे. देशात विविध ठिकाणी मॅगीच्या उत्पादनांचे नमुने गोळा करून त्याची तपासणी करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून अधिकृतपणे पहिल्यांदाच त्यांची भूमिका मांडण्यात आली.

Story img Loader