‘फक्त दोन मिनिटांत’ तयार होणाऱ्या मॅगीची चव जिभेवर अधिक काळ रेंगाळत राहावी यासाठी त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट (एमएसजी) आणि शिसे यांचे अतिप्रमाणात मिश्रण करणाऱ्या नेस्ले इंडिया या उत्पादक कंपनीविरोधात आता अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मॅगीची आणखी पाकिटे बाजारातून परत मागवली असून त्यांची कडक तपासणी करण्यात येणार आहे.
पदार्थाची चव वाढावी यासाठी त्यात शिसे व एमएसजी यांचे मिश्रण टाकण्यात येते. मात्र त्यासाठी त्यांचा मर्यादित प्रमाणात वापर करावा लागतो. त्यासाठीची मानके एफडीएने ठरवून दिली आहेत. परंतु मॅगीच्या दोन लाख पाकिटांत या पदार्थाचे प्रमाण अती झाल्याचे निदर्शनास आले आहे. लखनऊ परिसरातील पाकिटांची ही तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर दोन लाख पाकिटे माघारी बोलावण्यात आली. अधिक तपासणीनंतर मॅगी खाणे आरोग्यासाठी घातक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता बाजारात उपलब्ध असलेल्या आणखी मॅगीच्या पाकिटांची कठोर तपासणी करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश एफडीएने घेतला असून एप्रिलपर्यंतची पाकिटे तपासण्यात येणार आहेत.
दरम्यान, या कारवाईसंदर्भात नेस्ले इंडियाने अधिक तपशील देताना माघारी बोलावण्यात आलेली अथवा संबंधित पदार्थाचे अतिप्रमाण असलेली पाकिटे फेब्रुवारी, २०१४ मध्ये उत्पादित करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्यांची वापरायोग्य अंतिम तारीख नोव्हेंबर, २०१४ ही असल्याचेही कंपनीने निदर्शनास आणून दिले आहे. एफडीएच्या तपासणीस कंपनीकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, तसेच मान्यताप्राप्त व प्रतिष्ठित संस्थेतर्फेही मॅगीची तपासणी करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Story img Loader