नेस्ले कंपनीच्या मॅगी नूडल्समध्ये शिसे व एमएसजी दोन्हीही घटक प्रमाणाबाहेर असल्याने त्यावर भारतातील राज्यामागून राज्ये बंदी घालत असतानाच मॅगी खाण्यास सुरक्षित असल्याचा दावा नेस्लेचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्क यांनी शुक्रवारी केला. आतापर्यंत भारतात निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणामुळे आम्ही मॅगी माघारी घेत आहोत, निराधार दाव्यांमुळे भारतीय बाजारपेठेत भारतीय ग्राहकांचा विश्वास आम्ही गमावला, असे त्यांनी सांगितले.
नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल बुल्क हे स्वित्र्झलडमधून थेट भारतात आले व मॅगीबाबतच्या वादाचा आढावा त्यांनी घेतला. मॅगीवर दिल्ली, तामिळऩाडू, गुजरात व इतर काही राज्यांत बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निराधार दाव्यांमुळे ग्राहकांच्या विश्वासास तडा गेला आहे. मॅगीची नऊ प्रकारची उत्पादने माघारी घेण्यात आली असून, ती सेवनास घातक असल्याचे एफएसएसएआय या भारतीय अन्न नियंत्रक संस्थेने म्हटले आहे.
मॅगी बाजारातून मागे घेत आहोत. ग्राहकांचा विश्वास जिंकणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे बुल्क यांनी स्पष्ट केले. काल सायंकाळी नेस्ले इंडियाने मॅगी माघारी घेण्याचे ठरवले.मोनोसोडियम ग्लुटामेट व शिसे जास्त प्रमाणात असल्याने दिल्लीपाठोपाठ गुजरात, तामिळनाडू, जम्मूु-काश्मीर, उत्तराखंड या राज्यांनी मॅगी नूडल्सवर बंदी घातली. नंतर तामिळनाडू व उत्तराखंड सरकारनेही तीन महिने बंदी घातली आहे. गुजरात सरकारने एक महिना बंदी घातली आहे. काश्मीरमध्येही एक महिना बंदी घातली आहे. चार राज्यांनी मॅगीचा साठा माघारी घेण्यास नेस्ले कंपनीला सांगितले आहे.
‘एस.के’च्या नूडल्सवरही बंदी
गुजरात सरकारने सनफीस्ट व एस.के.फूडसच्या इन्स्टंट नूडल्सचे नमुने तपासले असून त्यातील एस.के. फूडसच्या नमुन्यात शिसे जास्त असल्याने त्यावर महिनाभर बंदी घातली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा