नेस्ले इंडियाच्या मॅगी नूडल्समध्ये मोनो सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) व शिशाचे प्रमाण जास्त आढळल्याने देशभर नमुने घेतले जात असतानाच दिल्लीत मंगळवारी झालेल्या तपासणीतही मॅगीच्या १३पैकी १० नमुन्यांत शिशाचे प्रमाण जास्त आढळले आहे. मॅगीची जाहिरात करणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन तसेच माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्यासह नेस्ले इंडियाच्या अधिकाऱ्यांवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याचे आदेश बिहारमधील न्यायालयाने दिल्याने चित्रपट सृष्टीलाही धक्का बसला आहे. केरळने मॅगीवर बंदी घातली आहे.
हरयाणा, राजस्थान व कर्नाटकातही मॅगीचे नमुने तपासले जाणार आहेत. नेस्ले इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मोहन गुप्ता व सह संचालक सबाब आलम यांच्यावरही प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाले आहेत.
जन्मठेपेची तरतूद करणार?
अशा प्रकरणांना आळा बसावा यासाठी जन्मठेपेची तरतूद असलेली कायदा दुरुस्ती करण्याचा केंद्राचा विचार आहे, असे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. जाहिरात करणाऱ्यांनाही जन्मठेपेच्या कक्षेत आणले जाईल, असे ते म्हणाले.
आम्ही ६०० बॅचमधील नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून कंपनीच्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत जवळपास १ हजार बॅचेसमधील नमुन्यांची चाचणी झाली आहे. त्यात शिशाची पातळी अन्न नियामक मंडळाने घालून दिलेल्या मर्यादांची पूर्तता करते.