शिसे आणि अजिनोमोटो यांच्या अतिप्रमाणामुळे भारतात बंदी घालण्यात आलेल्या मॅगीला ब्रिटनच्या अन्न दर्जा सुरक्षा प्राधिकरणाने (एफएसए) मात्र निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिले आहे. मॅगीच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात शिशाचे अतिप्रमाण आढळले नसून ती खाण्यास योग्य असल्याचा निर्वाळा एफएसएने दिला आहे.
भारतातील बंदीच्या पाश्र्वभूमीवर भारतातून आयात होणाऱ्या मॅगीच्या नमुन्यांची ब्रिटनमध्ये तपासणी करण्यात आली. त्यात ‘मसाला चवी’च्या मॅगीचा विशेष समावेश होता. या तपासणीत मॅगीमध्ये शिसाचे अतिप्रमाण आढळले नसून युरोपीय संघाच्या निर्देशित प्रमाणानुसार त्यात शिसाचा समावेश असल्याचे अन्न दर्जा सुरक्षा प्राधिकरणाने स्पष्ट केले. मॅगीच्या निर्मात्या नेस्ले कंपनीने एफएसएकडे मॅगीच्या विविध प्रकारांचे एकूण ९०० नमुने तपासणीसाठी दिले होते. त्यात शिसाचे प्रमाण अति नसल्याचे आढळून आल्याचे एफएसएने म्हटले आहे. ब्रिटनबरोबरच व्हिएतनाम, सिंगापूर व ऑस्ट्रेलिया येथील अन्न व औषध प्रशासनांनी मॅगीला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र बहाल केले आहे.
भारतातील घटनांच्या पाश्र्वभूमीवर आम्ही खबरदारी म्हणून  ‘मेड इन इंडिया’ मॅगीच्या नमुन्यांची तपासणी केली. मात्र, त्यात शिसाचे अतिप्रमाण आढळले नाही. युरोपीय संघाने निर्देशित केलेल्या प्रमाणानुसारच शिसाचा त्यात समावेश असल्याचे निदर्शनास आले.
– अन्न दर्जा सुरक्षा प्राधिकरण, ब्रिटन

Story img Loader