Maghi Purnima Snan New Traffic Rules : माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सहा पवित्र दिवसांपैकी एक असलेल्या पाचव्या स्नानासाठी कोट्यवधि भाविक प्रयागराज येथे जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी येथे वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येदिवशी ३० भाविकांचा चेंगराचेंगरीदरम्यान मृत्यू झाला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माघी पौर्णिमेला (१२ फेब्रुवारी) गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मंगळवारी (११ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजल्यापासून परिसरात नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर, वेगवेगळ्या मार्गांसाठी वेगवेगळे पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत, तिथे शहराबाहेरून येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने पार्क करावी लागतील. उद्याच्या संपूर्ण दिवस हीच वाहतूक व्यवस्था लागू राहील. तर, अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांना निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. संगमाजवळ ठराविक काळासाठी राहणाऱ्या कल्पवासींच्या वाहनांनाही हे निर्बंध लागू असतील.

सोमवारी रात्री पोलिस आणि नागरी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमासाठी केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. योगी आदित्यनाथ यांनी सुव्यवस्थित वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापन योजनेचे आवाहन केले. त्यांनी अधिकाऱ्यांना ५ लाखांहून अधिक वाहनांच्या उपलब्ध पार्किंग क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्याचे निर्देश दिले. “रस्त्यांवर वाहनांच्या लांब रांगा लागू देऊ नयेत. वाहतूक कोंडी कोणत्याही परिस्थितीत रोखली पाहिजे”, असे आदेश मुख्यमंत्र्‍यांनी दिले आहेत.

८ ते १० किमी पायी प्रवास

तुम्ही जर प्रयागराजला जात आहात तर तुम्हाला कदाचित ८ ते १० किमी चालत प्रवास करावा लागेल. बॉर्डरपासूनच तुम्हाला शटल बस किवा ऑटोने प्रयागराजमध्ये प्रवेश करावा लागेल. तिथून महाकुंभ येथे पोहोचायला ८ ते १० किमी पायी चालावं लागेल. अन्यथा तुम्ही १२ फेब्रुवारीच्या माघी पौर्णिमा स्नानानंतरच प्रयागराजला पोहोचाल.

२९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दुसऱ्या शाही स्नानात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर वाहतूक नियोजनाचा हा निर्णय घेण्यात आला. अधिकृत आकडेवारीनुसार, चेंगराचेंगरीत किमान ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले होते.

आतापर्यंत ४४.४७ कोटी भाविकांनी केले अमृतस्नान

चेंगराचेंगरीच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आणि एका महिन्यात अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग नियुक्त करण्यात आला आहे. या पॅनेलमध्ये न्यायमूर्ती हर्ष कुमार, माजी महासंचालक व्हीके गुप्ता आणि निवृत्त आयएएस अधिकारी व्हीके सिंह यांचा समावेश आहे. न्यायालयीन चौकशी व्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. जगातील सर्वात मोठा मेळावा, महाकुंभ १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत ४४.७४ कोटी लोक कुंभमेळ्याला उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maghi purnima snan maha kumbj 2025 prayagraj new traffic rules no vehicle zone in marathi sgk