Nepal Earthquake: काही दिवसांपूर्वी म्यानमार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले होते. यामध्ये तीन हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता नेपाळही भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले आहे. नेपाळमध्ये हा भूकंप संध्याकाळी ७.५५ च्या सुमारास झाला आहे. यामुळे घाबरलेले लोक घराबाहेर पळू लागले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० इतकी नोंदवण्यात आली. त्याचे केंद्र जमिनीपासून सुमारे २० किलोमीटर खोलीवर होते. दरम्यान नेपाळबरोबर उत्तर भारतातील काही भागांमध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे अद्याप नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त आलेले नाही.
म्यानमारमध्ये हाहाकार
दरम्यान, २८ मार्च रोजी म्यानमार ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरले होते. यात ३,००० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले, तर ४,५०० लोक जखमी झाले होते. यामध्ये ३४१ जण अद्याप बेपत्ता आहेत. लष्कराच्या नेतृत्वाखालील म्यानमार सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शोध आणि बचाव पथकांना आणखी मृतदेह सापडल्याने म्यानमारमध्ये मृतांची संख्या गुरुवारी ३,०८५ वर पोहोचली आहे. २८ मार्च रोजी झालेल्या ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडालेजवळ होते.
“म्यानमारमधील परिस्थिती अजूनही गंभीर असून, शोध आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे”, असे म्यानमार लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे.
म्यानमारमधील या भूकंपाचे चीन, थायलंड, व्हिएतनाम आणि भारताच्या काही भागात धक्के जाणवले होते. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आणि इमारती कोसळल्या होत्या.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा खूप जास्त आहे आणि दूरसंचार सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संपर्क साधणे कठीण झाले आहे.