Prayagraj Mahakumbh Mela 2025 Vehicle Restrictions : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी स्नान केल्याचा दावा उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी केला. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्यास मोक्ष मिळतो अशी अनेक भाविकांची समजूत आहे. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी, १३ जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ उद्या बुधवारी, २६ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेश सरकारने चोख नियोजन केले आहे. महाकुंभ परिसरात पूर्णपणे नो झोन व्हेइकल जाहीर करण्यात आला असून जवळच्या घाटावर जाऊन स्नान करण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.

आजपासून वाहनबंदी लागू होणार

संपूर्ण महाकुंभ परिसरात आज दुपारी ४ वाजल्यापासून वाहन प्रवेश बंदी असेल. तर प्रयागराज येथे सायंकाळी ६ वाजल्यापासून हे निर्बंध लागू केले जातील. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी या उपाययोजना लागू करण्यात येत आहेत. या काळात फक्त आवश्यक वस्तूंची सेवा करणाऱ्या वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे.

भाविकांनी स्नान कुठे करावे?

भक्तांनी त्यांच्या प्रवेशद्वारांनुसार जवळच उभारलेल्या घाटांवर स्नान करावं. दक्षिणी झुंसी मार्गावरून येणाऱ्यांना अरैल घाटाचा वाटप करावा. तर उत्तरी झुंसी मार्गावरून येणाऱ्यांनी हरिश्चंद्र घाट आणि जुना जीटी घाटाचा वापर करावा. पांडे क्षेत्रातून प्रवेश करणाऱ्यांना भारद्वाज घाट, नागावसुकी घाट, मोरी घाट, काली घाट, राम घाट आणि हनुमान घाटाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन सेवा सुरळीत राहणार

दूध, भाज्या, औषधे, इंधन आणि आपत्कालीन वाहनांच्या वाहतुकीसह आवश्यक सेवांवर निर्बंध राहणार नाहीत. डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी यांसारख्या कर्मचाऱ्यांनाही मुक्त हालचाल करता येणार आहे, असं सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे.

२६ फेब्रुवारी हा दिवस महाकुंभमेळ्याचा शेवटचा दिवस आहे. त्यातच उद्याच महाशिवरात्री आहे, त्यामुळे हा योग जुळून आल्याने उद्या महाकुंभात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळच्या घाटांवर पवित्र स्नान करावं आणि जवळच्या मंदिरातच प्रार्थना करावी, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. दरम्यान, मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक आठ कोटी भाविकांचे स्नान झाले होते. मकरसंक्रातीला ३.५० कोटी, पौष पौर्णिमेला १.७ कोटी, वसंतपंचमीला २.५७ कोटी, माघ पौर्णिमेला २ कोटी, १८ फेब्रुवारीपर्यंत ५५ कोटी, २२ फेब्रुवारीपर्यंत ६० कोटी भाविकांनी स्नान केले असून महाशिवरात्रीपर्यंत ६५ कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा आहे.

Story img Loader