नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर सुरू असलेल्या महाकुंभासाठी जमलेल्या भाविकांच्या सुरक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर सोमवार, ३ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

मौनी अमावस्येच्या दिवशी, २९ जानेवारीला कुंभमेळम्यात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान ३० जणांचा मृत्यू झाला असून किमान ६० जण जखमी आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाकुंभाला उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी निश्चित मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करावे अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळानुसार, या याचिका सोमवारी सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आल्या आहेत.

सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी होईल. ॲड. विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेत, चेंगराचेंगरीच्या घटना टाळण्याची व राज्यघटनेच्या अनुच्छेद २१अंतर्गत समानता व जीवनाच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्र सरकार व सर्व राज्यांना पक्षकार करण्यात आले आहे. महाकुंभातील भाविकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांना एकत्रित काम करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी ॲड. तिवारी यांनी केली आहे.

याचिकाकर्त्याच्या मागण्या

– उपस्थितांना सुरक्षेचे नियम समजावून सांगण्यासाठी एसएमएस व व्हॉट्सॲपचा वापर करावा

– उत्तर प्रदेश सरकार व अन्य राज्यांच्या सरकारांमध्ये समन्वय असावा

– भाविकांच्या सोयीसाठी अनेक भाषांमध्ये सूचना लिहाव्यात आणि घोषणा केल्या जाव्यात – महाकुंभाच्या ठिकाणी डॉक्टर व परिचारिकांची उपलब्धता, व्हीआयपींच्या हालचालींचे नियमन, जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य असावे

Story img Loader