Mahakumbh Traffic : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रोज लाखो भाविक दर्शनासाठी जात आहेत. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी जात असताना भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं दिसून येत आहे. आता महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांना रस्त्यांवर कैक किलोमीटर लांबपर्यंत अभूतपूर्व वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत असल्याचं समोर आलं आहे.

महाकुंभमेळ्यासाठी जात असलेल्या भाविकांना बिहारमध्येही ट्रॅफिकच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी प्रयागराजकडे निघालेले अनेक यात्रेकरू रोहतास जिल्ह्यात सुमारे १० किमी लांब वाहतूक कोंडीत अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत असल्यामुळे अनेक भाविकांना मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

महाकुंभमेळ्यासाठी जात असलेल्या भाविकांना ट्रॅफिकच्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याने यावरून काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी सरकारच्या नियोजनावर टीका केली आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटलं की, “लोकांना १५ ते २० किमी चालण्यास भाग पाडले जात आहे. जंक्शनवर जाण्यासाठी महिला, लहान मुले, वृद्ध यांची धडपड सुरू आहे. काय करावे ते त्यांना कळत नाही. अडकलेल्या भाविकांना मदत करण्यासाठी बसेस तैनात कराव्यात आणि मोफत वाहतूक उपलब्ध करून द्यावी”, अशी विनंती खासदार तिवारींनी सरकारला केली.

दरम्यान, माघी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सहा पवित्र दिवसांपैकी एक असलेल्या पाचव्या स्नानासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार योग्य त्या उपाय योजना करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येदिवशी ३० भाविकांचा चेंगराचेंगरीदरम्यान मृत्यू झाला होता. मात्र, पुन्हा अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

८ ते १० किमी पायी प्रवास करावा लागण्याची शक्यता

जर तुम्ही प्रयागराजला जात आहात तर तुम्हाला कदाचित ८ ते १० किमी चालत प्रवास करावा लागेल. बॉर्डरपासूनच तुम्हाला शटल बस किवा ऑटोने प्रयागराजमध्ये प्रवेश करावा लागेल. तिथून महाकुंभ येथे पोहोचायला ८ ते १० किमी पायी चालावं लागेल. अन्यथा तुम्ही १२ फेब्रुवारीच्या माघी पौर्णिमा स्नानानंतरच प्रयागराजला पोहोचाल. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दुसऱ्या शाही स्नानात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर वाहतूक नियोजनाचा हा निर्णय घेण्यात आला.

Story img Loader