Maha Kumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशमधील बलिया येथे एका तरुणाविरूद्ध खोटी बातमी पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभ मेळ्यात विधीदरम्यान ११ भाविकांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवल्याचे उघड झाले आहे. मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) राजेंद्र सिंह यांच्या तक्रारीनंतर पाकडी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. लालू यादव संजीव या आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या ३५३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआर संदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अवकुश कुमार सिंह यांनी सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म एक्सवर सोमवारी तक्रार केली होती. त्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा समाजवादी पक्षाशी संबंधित असून त्याने फेसबुकवर खोटी माहिती पसरवणारी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की “महाकुंभ स्नान विधीदरम्यान थंडीमुळे ११ भाविकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे आणि आयसीयू आणि आपत्कालीन कॅम्प रुग्णांच्या गर्दीने भरून गेले आहेत”.
आरोपीने प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यासंदर्भात केलेल्या खोट्या पोस्टमुळे लोकांमध्ये भीती पसरली आणि शांततेचा देखील भंग झाला, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी तक्रारीचा गंभीर दखल घेण्यात आली आणि या घटनेच्या तपासाचे काम पोलीस उपाधीक्षक मोहम्मद फहीम कुरेशी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. कुरेशी यांनी सांगितलं की या प्रकरणाच्या तपासानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.
महाकुंभ मेळाव्यासाठी राज्य सरकारची जय्यत तयारी
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभाच्या ऐतिहासिक महोत्सवात ४० कोटींहून अधिक भाविक गंगा नदीच्या किनारी एकत्र येतील असे सांगण्यात आले होते. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ मेळ्याच्या तयारीसाठी ६९९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. याआधी २०१९ च्या कुंभमेळ्यासाठी ३,७०० कोटी रुपये खर्च झाले होते. यावेळी यावेळीच्या महाकुंभापूर्वी पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनावर भर देण्यात आला होता. या महाकुंभ मेळ्यामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेवर २ लाख कोटी रूपयांपर्यंतचा सकारात्मक प्रभाव पडेल असा अंदाज आहे. २५,००० कोटी रूपयांची उलाढाल केवळ उत्सवाच्या ठिकाणी असणाऱ्या व्यापारातून होईल, असे सांगितले जात आहे.