Images Of Mahakumbh From ISRO : भारतीय अंतराळ संस्था इस्रोने उपग्रहांचा वापर करून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याची छायाचित्रे टिपली आहेत. दरम्यान इस्रोच्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरच्या संकेतस्थळावर ही छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. यामध्ये महाकुंभ मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा दिसत आहेत. दरम्यान यंदाचा महाकुंभ मेळा तब्बल ४५ दिवस चालणार असून यामध्ये देशासह जगभरातील सुमारे ४० कोटी भाविक येतील अशी अपेक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आणि डे-नाईट रडारसॅटचा वापर करून, हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीची छायाचित्रे टिपली आहेत.

याबाबत बोलताना एनआरएससीचे संचालक डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, “प्रयागराजला वेढलेल्या क्लाउड बँडद्वारे परिसराचे चित्रण करण्यासाठी रडारसॅटचा वापर केला आहे. ही छायाचित्रे १५ सप्टेंबर २०२३ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी घेतली आहेत, ज्यामध्ये तात्पुरती टेंट सिटी, नदीवरील पोंटून पूल आणि रस्त्यांचे जाळे दिसत आहे.”

४० कोटी भाविकांसाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ नगर नावाचा एक नवीन जिल्हा तयार केला आहे. ज्यामध्ये १,५०,००० हून अधिक तंबू, ३,००० स्वयंपाकघरे, १,४५,००० स्वच्छतागृहे आणि ९९ पार्किंग लॉटचा समावेश आहे.

परेड ग्राऊंड आणि शिवालय

महाकुंभ सुरू होण्यापूर्वी ६ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये प्रयागराज परेड ग्राउंड दिसत आहे. त्यानंतर येथे मोठे बदल होत असतानाचे २२ डिसेंबर २०२४ रोजी छायाचित्र आहे. यानंतर जेव्हा त्याचा वापर सुरू झाला तेव्हा १० जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या छायाचित्राचाही यात समावेश आहे.

यामध्ये नवीन शिवालय उद्यानाच्या निर्मितीच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. जी अवकाशातून घेतली आहेत. ६ एप्रिल २०२४ च्या छायाचित्रात एक मोकळे मैदाना दिसत आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये, शिवालय उद्यान अस्तित्वात आल्याचे पाहायला मिळत आहे.

महाकुंभमधील शिवालय आणि परेड ग्राऊंडची छायाचित्रे. (Photo- http://www.nrsc.gov.in)

काय असतो महाकुंभ मेळा?

यंदा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महा कुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या या मेळ्याला पूर्ण कुंभ असेही म्हणतात. जगभरातील भाविकांचीा सर्वात मोठा मेळा असतो. यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात.

कुंभ मेळ्याची सुरूवात ही पौराणिक कथा, इतिहास आणि श्रद्धा यांच्या मिश्रणात आढळते. हिंदू पौराणिक कथेनुसार देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनामधून निघालेले अमृत हे पृथ्वीवर चार ठिकाणी सांडले- हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर, जिथे हा उत्सव साजरा केला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha kumbh mela 2025 isro satellite images space satellite technology aam