Mahakumbh 2025 Photo From ISS : प्रयागराज येथे १३ जानेवारीपासून सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर कोट्यवधि भाविकांनी स्नान केले. गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास १० कोटी भाविकांनी हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली. दरम्यान, एकाच वेळी एकाच ठिकाणी एवढा मोठा जनसमुदाय लोटल्यानंतर अवकाशातून ते स्थान कसं दिसत असेल याचं चित्र थेट अंतराळातून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
यात्रेकरूंची संख्या दिवसागणिक वाढत असून, दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी आणि आध्यात्मिक पुण्य प्राप्तीसाठी येत असल्याचे सरकारने म्हटले आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने यंदाच्या महाकुंभला ४५ कोटींहून भाविक येतील असा अंदाज यापूर्वी व्यक्त केला आहे. देशासह जगभरातून भाविक मोठ्या उत्साहात आणि हिरिरीने दाखल होऊन त्रिवेणी संगमात पवित्र स्नान घेत आहेत. दरम्यान, डॉन पेटीट या अंतराळवीराने अवकाशातून महाकुंभचे छायाचित्र टिपले आहे.
गंगा नदीवरून रात्रीच्या काळातील फोटो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून टिपण्यात आले आहे. यामध्ये गंगा नदीचा भाग कसा उजळून निघालाय हे स्पष्ट दिसतंय.
2025 Maha Kumbh Mela Ganges River pilgrimage from the ISS at night. The largest human gathering in the world is well lit. pic.twitter.com/l9YD6o0Llo
— Don Pettit (@astro_Pettit) January 26, 2025
इस्रोनेही टिपले होते फोटो
काही दिवसांपूर्वी इस्रोनेही काही फोटो टिपले होते. इस्रोने भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आणि डे-नाईट रडारसॅटचा वापर करून, हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीची छायाचित्रे टिपली होती.
याबाबत बोलताना एनआरएससीचे संचालक डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, “प्रयागराजला वेढलेल्या क्लाउड बँडद्वारे परिसराचे चित्रण करण्यासाठी रडारसॅटचा वापर केला आहे. ही छायाचित्रे १५ सप्टेंबर २०२३ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी घेतली आहेत, ज्यामध्ये तात्पुरती टेंट सिटी, नदीवरील पोंटून पूल आणि रस्त्यांचे जाळे दिसत आहे.”
४० कोटी भाविकांसाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ नगर नावाचा एक नवीन जिल्हा तयार केला आहे. ज्यामध्ये १,५०,००० हून अधिक तंबू, ३,००० स्वयंपाकघरे, १,४५,००० स्वच्छतागृहे आणि ९९ पार्किंग लॉटचा समावेश आहे.