वृत्तसंस्था, प्रयागराज

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे तासनतास वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. परिणामी, प्रशासनाने महाकुंभ परिसरात वाहतुकीवर आणखी निर्बंध घातले आहेत. यामुळे राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या महाकुंभ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

समाजमाध्यमांवर सामायिक झालेल्या एका ध्वनिचित्रफितीत संगम मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची न संपणारी, अक्षरश: गोगलगायीच्या वेगाने पुढे सरकणारी रांग दिसत होती. ही वाहतूक रांग तब्बल २०० ते ३०० किमी लांब होती असा दावा अनेकांनी केला, मात्र त्याची पुष्टी होऊ शकली नाही. ही ध्वनिचित्रफित प्रसिद्ध झाल्यानंतर जगातील सर्वात मोठा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा म्हणून चर्चिल्या जाणाऱ्या महाकुंभाच्या व्यवस्थापनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत प्रयागराजला इतर शहरांशी जोडणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे स्थानकावरही तुडुंब गर्दी आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी त्रिवेणी संगमावर स्नान केले. दिवसभर प्रयागराजमध्ये थांबून त्यांनी विविध धार्मिक विधीही केले.

प्रयागराज महाकुंभात अडकून पडलेल्या कोट्यवधी भाविकांसाठी तातडीने आपत्कालीन व्यवस्था केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडीत अडकलेले, तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या भाविकांना मानवतेने वागवावे. लखनऊला जाणाऱ्या मार्गावर ३० किमी, रेवा मार्गावर १६ किमी आणि वाराणीसच्या बाजूला १२ ते १५ किमी वाहतूक कोंडी आहे. – अखिलेश यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष

महाकुंभाला मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या भाविकांचे स्वागत करायला मिळणे ही आमच्यासाठी भाग्याची बाब आहे. पण त्याच वेळी आम्हाला त्यांची सुरक्षा आणि स्वास्थ्य याविषयीच्या व्यवस्थेची चिंता वाटते. – मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

गोंदियाजबलपूर, चांदाफोर्ट पॅसेंजर रद्द

नागपूर : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतर्फे कुंभमेळासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येत आहे. त्यासाठी नियमित धावणारी गोंदिया-जबलपूर-गोंदिया आणि जबलपूर-चांदाफोर्ट-जबलपूर पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे. कुंभमेळा स्पेशल ट्रेन सुरू करण्यासाठी जबलपूर-गोंदिया-जबलपूर ट्रेनचा ‘रेक’ वापरण्यात येत आहे. जबलपूर-गोंदिया-जबलपूर १० व ११ फेब्रुवारी २०२५ ला रद्द करण्यात आली आहे.