Mahakumbh Stampede: मौनी अमावस्यानिमित्त प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी एकच गर्दी उसळल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. यात १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास संगम घाटावर चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. या घटनेनंतर आता १९५४ साली मौनी अमावस्येलाच कुंभ मेळ्यात घडलेल्या दुर्घटनेचे स्मरण केले जात आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर हा पहिलाच कुंभ मेळा होता. ज्याचे आयोजन भारत सरकारने केले होते. ३ फेब्रुवारी १९५४ रोजी संगम घाटावर एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ५०० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९५४ च्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर कुंभ मेळा आणि इतर धार्मिक उत्सवाच्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी बरेच बदल करण्यात आले. लोकांना महत्त्वाची सूचना देण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर सुरू झाला. रात्री वाट दिसावी, यासाठी १००० हून अधिक स्ट्रिट लाईट बसविण्यात आल्या. तसेच या घटनेनंतर कुंभ मेळ्यातील मिरवणुकांमध्ये हत्तीवर बंदी घालण्यात आली.

नेहरूंची ती भेट वादग्रस्त ठरली

१९५४ च्या चेंगराचेंगरीच्या घटनेला माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार असल्याचा आरोप काही जणांनी केला. ज्यादिवशी ही घटना घडली त्या मैनी अमावस्येला पंडित नेहरूंनी संगम घाटावर शाही स्नान केले होते. त्यांच्या भेटीसाठी संगम घाटावर चोख बंदोबस्त करण्यात आला होता. ज्यामुळे सामान्यांना बराच काळ संगम घाटावर जाण्यापासून रोखून ठेवले गेले होते. या घटनेमुळे नंतर गर्दी आटोक्याच्या बाहेर गेल्याचे सांगितले जाते. मात्र बीबीसीने त्यावेळी दिलेल्या वृत्तानुसार पंडित जवाहरलाल नेहरू हे आदल्या दिवशी कुंभ मेळ्यात आले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. चेंगराचेंगरी झाली त्यावेळी ते तिथे उपस्थित नव्हते.

१९५४ च्या घटनेनंतर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कुंभ मेळ्यात मुहूर्ताच्या दिवशी व्हीआयपी लोकांच्या भेटी रद्द करण्यास सांगितल्या. आजही कुंभ, अर्ध कुंभ आणि महाकुंभमध्ये हा नियम पाळला जात आहे. याशिवाय उत्तर प्रदेश सरकारनेही वेळोवेळी खबरदारीचे पावले उचलली. संगम घाटानजीक तात्पुरते हॉस्पिटलही उभारले जाऊ लागले.

कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटना

१९८६ – १४ एप्रिल रोजी हरिद्वार येथे उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काही व्हीआयपी मंडळी कुंभ मेळ्यात गेले. ज्यामुळे भाविकांना काही काळ रोखून धरण्यात आले होते. ज्यामुळे चेंगराचेंगरी होऊन २०० लोकांचा मृत्यू झाला.

२००३ – नाशिकमध्ये झालेल्या कुंभ मेळ्याठिकाणी चेंगराचेंगरी होऊन ३९ लोकांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

२०१० – हरिद्वार येथे शाही स्नानावेळी साधू आणि भाविकांमध्ये संघर्ष उडाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात सात लोकांचा मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले.

२०१३ – प्रयागराज येथे अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी होऊन ४२ लोकांचा मृत्यू झाला होता.