Mahabharata era Shivling vandalism: उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात असलेल्या बिल्लेश्वर महादेव मंदिरातील महाभारतकालीन ऐतिहासिक अशा शिवलिंगाची विटंबना करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये रोष पसरला होता. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ताबडतोब आरोपी अवधेस कुर्मीला अटक केली. आरोपी वैफल्यग्रस्त असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याची पत्नी गेल्या काही काळापासून आजारी आहे. या तणावातून त्याने शिवलिंगाची मोडतोड केल्याचे मान्य केले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी दिली.
अवधेश कुर्मीने आणखी एका मंदिरातील शिवलिंगाची विटंबना केली असल्याचे पोलिसांना सांगितले. अखिलेश सिंह यांनी सांगितले की, आरोपीची पत्नी अनेक काळापासून अंथरुणाला खिळलेली असून तिच्या या परिस्थितीमुळे अवधेश कुर्मी तणावात आहे. स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीने पिचलेल्या कुर्मीने हताश होऊन हे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. तरीही या प्रकरणाचा आणखी तपास केला जात असून योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
हिंदू जागरण मंचाचे अजय त्रिवेदी म्हणाले की, मंदिरात असलेल्या शिवलिंगाचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व मोठे आहे. मात्र शिवलिंगाची मोडतोड झाल्यामुळे असंख्य भाविकांच्या भावनांना तडा गेला आहे.
गावातील स्थानिकांच्या मतानुसार, महाभारतात भगवान कृष्ण आणि अर्जून हस्तिनापूरला जात असताना त्यांनी या शिवलिंगाची मुहूर्तमेढ रचली होती. दंतकथेनुसार असेही म्हटले जाते की, शिवलिंगाची पूजा करण्यासाठी अर्जूनाने भूमीत बाण मारून पाणी बाहेर काढले होते. या पाण्याचा स्त्रोत आजही याठिकाणी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मंदिर-मशिदीचा वाद सध्या जोरात सुरू आहे. संभल येथील मशिदीत उत्खनन केल्यापासून अनेक ठिकाणी सर्वेक्षणाची मागणी करणाऱ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. स्थानिक न्यायालयांपासून ते सर्वोच्च न्यायालयांपर्यंत या विषयाची चर्चा आहे. त्यामुळेच हिंदू मंदिरात मोडतोड झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ याचा तपास सुरू केला आणि आरोपीला जेरबंद करत लोकांमधील रोष कमी केला.