सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला बहुमत मिळालं आहे. या बहुमताच्या जोरावर आज एनडीएच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र दिले. हे पत्र स्वीकारून राष्ट्रपतींनी पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिलं आहे. दरम्यान, त्याआधी नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. यासाठी आज एनडीएची बैठक घेण्यात आली. त्यावेळी काही रंजक किस्से घडले आहेत. हे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजयी खासदारांचं अभिनंदन करण्यासाठी आणि संसदीय नेत्याची नियुक्ती करण्याकरता आज एनडीएतील घटकपक्षांची बैठक राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींची भेट घेण्याकरता अनेक नेत्यांची रांग लागली होती. यावेळी काही नेत्यांनी इतर नेत्यांनी दिलेलेच बुके पुन्हा नरेंद्र मोदींच्या हाती ठेवले. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचाही क्रमांक लागतो.

हेही वाचा >> नरेंद्र मोदी यांची भारताच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड, राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब, शपथविधीचंही दिलं आमंत्रण!

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. अजित पवारांची नरेंद्र मोदींनी भेट घेतली. या भेटीदरम्यान, अजित पवारांनी नरेंद्र मोदींना पुप्षगुच्छ दिला. हा पुष्पगुच्छ स्वीकारून नरेंद्र मोदींनी मागे उभे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती दिला. त्या सुरक्षा रक्षकाने तो पुष्पगुच्छ त्याच्या मागे असलेल्या त्याच्या सहकाऱ्याच्या हातात दिला. तिथेच महादेव जानकर उभे होते. महादेव जानकरांनी त्या सुरक्षा रक्षकाच्या हातातील पुष्पगुच्छ स्वतःकडे घेतला आणि तोच पुष्पगुच्छ पुन्हा नरेंद्र मोदींना देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नेमका हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओंवर तुफान प्रतिक्रियाही येत आहेत.

उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचाही तसाच प्रताप

एकदा दिलेला पुष्पगुच्छ पुन्हा देणारे महादेव जानकर हे एकमेव नेते नव्हेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांनीही असंच केल. नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरता ते बैठकीच्या ठिकाणी असलेल्या टेबलवर पुष्पगुच्छ शोधत होते. तेवढ्यात कोणीतरी तिथं पुष्पगुच्छ ठेवला. लागलीच केशवप्रसाद मौर्ये यांनी हा पुष्पगुच्छ उचलला. खरंतर या पुष्पगुच्छावर मंत्री ब्रिजेश पाठक यांचा डोळा होता. पण, केशवप्रसाद मौर्या यांनी तो पुष्पगुच्छ खेचून घेतला. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, आजच्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदी निवड केली. नरेंद्र मोदी यांचा रविवारी ९ जून रोजी सायंकाळी ७.१५ मिनिटांनी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadev jankar met narendra modi but his this act caught everyones attention you will also laugh out loud after seeing the viral video sgk