लोकसभा निवडणूक जाहीर झालेली असताना बिहारमधील इंडिया जागावाटप अजूनही निश्चित होताना दिसत नाही. बिहारमध्ये एकूण ४० लोकसभा जागांसाठी महाआघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू झाली होती. तेव्हा काँग्रेसने १२ जागांवर दावा केला होता. हळूहळू त्या जागा कमी करून ७ ते ९ पर्यंत कमी झाल्याचं पाहायला मिळालं. असं असलं तरी अजूनही महाआघाडीतील चित्र स्पष्ट झालेलं नाही. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस जरी मोठा पक्ष असला तरी बिहारमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत राजद (RJD) आहे. त्यामुळे बिहारमधील काँग्रेस राजद महाआघाडीत जागावाटपावरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. जागावाटपावरून महाआघाडीवर संकट निर्माण झाल्याचं राजकिय जाणकार सांगत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागावाटपावरून काय काय घडतंय?

बिहारमध्ये राजदने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात अभय कुशवाह यांना तिकीट जाहीर केलं. यावरून काँग्रेसचे औरंगाबाद मतदरसंघांचे माजी खासदार आणि माजी राज्यपाल निखिल कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकतेच जदयू (JDU) सोडून आरजेडीमध्ये सामील झालेले कुशवाह जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करत त्यांनी जागावाटप एकतर्फी आणि काँग्रेसशी कोणतीही चर्चा न करता ठरत असल्यामुळे आरजेडीला युतिधर्माची आठवण करून दिली आहे.

आरोप-प्रत्यारोपांत राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी उमेदवार निश्चिती आणि योग्य जागावाटप करण्यासाठी आरजेडीने वारंवार पाठपुरावा केला मात्र काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही असा दावा शिवानंद तिवारी यांनी केला आहे.

काय म्हणाले शिवानंद तिवारी?

“काँग्रेसने आपल्या मित्रपक्षांच्या मागण्या काय आहेत ते ऐकलं पाहिजे. त्यांच्या भावना जपल्या पाहिजेत. हेच महाआघाडीतील सर्व पक्षांच्या हिताचं असेल. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान आरजेडीलाही मिळते, काँग्रेस त्यांच्या ताकदीपेक्षा अधिक जागांवर दावा करत आहे.” शिवानंद पुढे म्हणाले “महाआघाडीत काँग्रेस, आरजेडी शिवाय सीपीआय (एमएल) देखील आहे. त्यांचाही विचार करावा लागेल, त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात मतदार आहेत.” शिवानंद तिवारी यांनी महाआघाडीत बिघाड होण्याच्या गोष्टीचे मात्र खंडन केले. ते म्हणाले “आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव दिल्लीत आहेत आणि जागावाटपावर काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे महाआघाडीत कोणताही बिघाड झालेला नाही.” असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये १९ एप्रिल ते १ जून या काळात एकूण ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे.