अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्यावेळी तयार करण्यात आलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी कमकुवत करून अरविंद केजरीवाल हे जनतेची मोठी फसवणूक करत असल्याचा आरोप आपचे माजी सदस्य प्रशांत भूषण यांनी केला. केजरीवालांनाही मोदींप्रमाणेच प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. त्यामुळे त्यांनी जनलोकपाल विधेयकातील मजकूर जनतेसमोर आणला नसल्याची टीका भूषण यांनी केली. यावेळी भूषण यांनी दिल्ली सरकारच्या प्रस्तावित जनलोकपाल मसुद्यातील काही तरतुदी प्रसारमाध्यमांसमोर वाचून दाखवल्या. मंत्री आणि केंद्रीय अधिकाऱ्यांमधील वैरभाव वाढविण्यासाठीच त्यांना या कायद्याच्या कक्षेत आणण्याची तरतुद करण्यात आल्याचे भूषण यांनी सांगितले. याशिवाय, नव्या विधेयकात जनलोकपालाची नियुक्ती आणि त्याला पदावरून दूर करण्यासाठीच्या प्रक्रियेवरही भूषण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रक्रियेमुळे जनलोकपालास राज्य सरकारच्या मेहरबानीवर अवलंबून रहावे लागेल, असा आक्षेप भूषण यांनी नोंदवला. यापूर्वी केजरीवालांनी केंद्राच्या लोकपाल विधेयकाची संभावना जोकपाल अशी केली होती. मात्र, ते विधेयकदेखील केजरीवालांच्या आत्ताच्या विधेयकापेक्षा चांगले होते. त्यामुळे केजरीवालांच्या या नव्या विधेयकाला महाजोकपाल म्हणावे लागेल, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा