CPCB Report on Sangam Kumbh: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली असून रोज लाखो भाविक प्रयागराजच्या दिशेने जात आहेत. अनेकांना महाकुंभमेळ्यात उपस्थित राहून संगमावर जाऊन अमृतस्नान करायचे आहे. एकाबाजूला कोट्यवधी लोकांची श्रद्धा आणि धारणा असताना आता दुसऱ्या बाजूला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयागराजमधील दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो, तेथील पाण्याच्या अस्वच्छतेबद्दल धक्कादायक अहवाल दिला आहे. संगमाच्या ठिकाणी असलेले पाणी आंघोळीसाठी अजिबात योग्य नाही, तसेच हे पाणी प्राशन करण्यालायकही नाही, असेही मंडळाने म्हटले आहे. अनेक भाविक आंघोळीनंतर ओंजळीत घेऊन पाणी पित असतात.
अहवालात काय म्हटले?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा ताजा अहवाल आता राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) सुपूर्द करण्यात आला आहे.
मंडळाने तयार केलेल्या अहवालात म्हटले की, संगमावरील पाण्यात फेकल कोलीफॉर्मचा स्तर खूपच वाढला आहे. मंडळाच्या संशोधन पथकाने प्रयागराज येथील अनेक घाटावरून पाण्याचे नमुने गोळा केले. हे नमुने तपासल्यानंतर त्यामध्ये प्रदुषणकारी घटकांची संख्या अधिक असल्याचे आढळले. संगमावर रोज कोट्यवधी लोक आंघोळ करत असल्यामुळे फेकल कोलीफॉर्मचा स्तर वाढला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
उत्तर प्रदेश सरकारकडून नियोजनात अभाव?
महाकुंभ सुरू होण्यापूर्वीच येथील पाण्याच्या स्वच्छतेबाबत राष्ट्रीय हरित लवादामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा मिळूनही उत्तर प्रदेश सरकारने हालचाल केली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. हरित लवादाने आता पुढील सुनावणीसाठी उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सचिवांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. संगमावरील पाण्याबाबत याआधीही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.
महाकुंभने गर्दीचे रेकॉर्ड मोडले
महाकुंभमध्ये अस्वच्छता, चेंगराचेंगरी आणि आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी हा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यातून रोज मोठ्या संख्येने आणि मिळेल त्या मार्गाने लोक प्रयागराजच्या दिशेने जात आहेत. सरकारच्या आकड्यानुसार आतापर्यंत ५० कोटी लोकांनी महाकुंभला भेट दिली आहे. अजूनही महाकुंभचे ८ दिवस बाकी आहेत. त्यामुळे हा आकडा ६० कोटींच्या वर जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.