प्रयागराज : जगातील सर्वांत मोठा मेळावा असलेल्या महाकुंभला आज, सोमवारपासून पहिल्या शाही स्नानाने सुरुवात होणार आहे. पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा ४५ दिवस चालेल. दर १२ वर्षांनी होणाऱ्या महाकुंभसाठी हजारो साधू-संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दीड महिन्यात तब्बल ३५ कोटी भाविक येतील, अशी शक्यता गृहीत धरूनच उत्तर प्रदेश सरकारने या महासोहळ्याची तयारी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या महाकुंभसाठी आधीपासूनच साधू-संत आणि भाविक प्रयागराजमध्ये आले आहेत. मुख्य सोहळा सुरू होण्यापूर्वीच, शनिवारी गंगा-जमुना आणि अदृश्य स्वरूपातील सरस्वती नद्यांच्या संगमावर तब्बल २५ लाख भाविकांनी स्नान केले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेकदा प्रयागराजला भेट देऊन या तयारीचा आढावा घेतला. यंदाच्या सोहळ्यात परंपरा आणि विज्ञानाचा संगमही बघायला मिळेल. त्यामुळे एका अर्थी हा ‘डिजि-कुंभ’ असेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी प्रथमच उच्च तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कुंभमेळ्याच्या तयारीत करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> Maha Kumbh: १३ वर्षांच्या मुलीला साध्वी होण्यासाठी केले दान; दीक्षा देणाऱ्या महंताची जुन्या आखाड्याने केली हकालपट्टी

१४४ वर्षांनी महायोग

प्रयागराज येथे दर १२ वर्षांनी महाकुंभ होत असला, तरी यंदाचा महाकुंभ विशेष असल्याचे साधुसंतांचे म्हणणे आहे. सध्याची ग्रहस्थिती ही सर्वांत पवित्र असून १४४ वर्षांनंतर असा योग आल्याचे सांगितले जात आहे. या काळात प्रयागराज येथे केलेल्या कोणत्याही यज्ञाचा प्रभावही अधिक असेल, असा दावा काही साधुसंतांनी केला आहे. यंदाच्या महाकुंभमुळे राष्ट्राला आणि भाविकांना अधिक ऊर्जा मिळेल, असे गोवर्धन मठाचे पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ यांनी म्हटले आहे.

महाकुंभ जगभरातील लोकांना आपल्या प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक मुळांशी पुन्हा जोडण्याची संधी देतो. यंदाचा हा महाकुंभ अत्यंत नावीन्यपूर्ण, भव्य-दिव्य आणि तांत्रिकदृष्ट्याही प्रगत असेल. हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक बांधिलकीचे प्रतीकही आहे.– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh 2025 kumbh mela kicks off with paush poornima in prayagraj zws