Mahakumbh 2025 Stampede : प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा सुरु आहे. मौनी अमावस्येच्या पर्वणीच्या रात्री एक अप्रिय घटना घडली. साधारण रात्री २ च्या सुमारास संगम नोज या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. महाकुंभचे डीआयची वैभव कृष्ण यांनी सांगितलं की ही घटना नेमकी कशी घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले वैभव कृष्ण?

“भाविक ब्रह्म मुहुर्ताची वाट बघत होते, ब्रह्म मुहुर्तावर स्नान करणं पवित्र मानलं जातं. अचानक काही भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर आले. काहीही कल्पना नसताना पाठीमागून भाविकांची गर्दी आल्याने हलकल्लोळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. २९ तारखेला या ठिकाणी कुणीही व्हिआयपी येणार नव्हते. आगामी दिवसांमध्ये येणाऱ्या पर्वण्यांनाही व्हिआयपी मुव्हमेंट नसणार आहे. आज मौनी अमावस्या आहे. त्यामुळे मुख्य स्नान पर्वणी आज आहे. अशातच बेला परिसरातल्या आखाड्यात गर्दीचा ओघ खूप वाढला. त्यामुळे अलिकडे उभे असलेल्या लोकांनी पुढे उडी मारण्यास सुरुवात केली. यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० मृत्यू झाले आहेत. ज्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर ६० भाविक जखमी झाले आहेत. त्यांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही १९२० हा हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे.”

प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलं?

पीटीआयला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. जे लोक स्नान करण्यासाठी आले होते त्यांना पहाटे ३ च्या दरम्यान स्नान करुन मौनी अमावस्येची पर्वणी साधायची होती. मात्र चेंगराचेंगरी झाली. या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुलतानपूर येथील भाविकाने काय सांगितलं?

सुलतानपूर या ठिकाणाहून आम्ही आलो आहोत असं बसदेव शर्मा यांनी सांगितलं. मात्र शाही स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, या दरम्यान आमच्याकडचे पैसे चोरीला गेले. प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. असंही शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. तसंच माझ्या कुटुंबातला एक जण त्या चेंगराचेंगरीत सापडून जखमी झाला असंही त्यांनी सागितलं. लोक फक्त मोठ्या प्रमाणावर गर्दी करत होते, त्यांना कुणी अडवतही नव्हतं अशीही माहिती शर्मा यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

किशोर कुमार साहू यांची पत्नी बेपत्ता

किशोर कुमार साहू यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, आमच्या कुटुंबातले दहा लोक शाही स्नान करण्यासाठी आलो होतो. पवित्र स्नान करण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. आम्ही दुपारी स्नान केलं आणि रात्री पुन्हा एकदा डुबकी मारावी म्हणून गेलो होतो. त्यावेळी माझी पत्नी पाण्यात उतरायचं म्हणून कपडे बदलण्यासाठी गेली होती. त्यावेळी मी तिला शेवटचं पाहिलं त्यानंतर ती मला दिसलेली नाही. आता किशोर कुमार साहू हे त्यांच्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेत आहेत. त्यांच्या हातात तिचं आधार कार्ड आहे. माझी पत्नी हरवल्याची तक्रार मी चार ठिकाणी केली. मात्र फारसा काही उपयोग झाला नाही. या ठिकाणी कुणीही कुणाला मदत करताना दिसून येत नाही. असंही साहू यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh 2025 stampede devotees were waiting for brahma muhurta then crowd came from behind what dig told scj