Mumbai-Prayagraj Flight Ticket Rate : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली असून, देशासह जगभरातील भाविकांची पावले प्रयागराजकडे वळू लागली आहेत. अशात विमान तिकिटांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रयागराजला जाण्यासाठी अनेक भाविक विमान प्रवासाला पसंती देत असल्याने विमान तिकिटांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
मुंबई-प्रयागराज विमान तिकीट दर
१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ट्रॅव्हल पोर्टल ixigo च्या माहितीनुसार, दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील एकेरी भाडे आता सरासरी ५,७४८ रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, मुंबई-प्रयागराज विमानांच्या तिकीट दरांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील विमान भाडे आता सरासरी ६,३८१ रुपये झाले आहे.
भोपाळ-प्रयागराज विमान तिकिट ४९८ टक्क्यांची वाढ
दरम्यान मध्य प्रदेशातील भोपाळ ते प्रयागराज मार्गावरील विमानांच्या भाड्यात सर्वाधिक ४९८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भोपाळहून प्रयागराजला जाण्यासाठी २,९७७ रुपये इतके विमान भाडे होते. ते आता १७,७९६ रुपये इतके झाले आहे. बेंगळुरू ते प्रयागराज आणि अहमदाबाद ते प्रयागराज यासारख्या इतर मार्गांवरही अनुक्रमे ८९ टक्के आणि ४१ टक्के भाडेवाढ झाली आहे.
विमानांची तिकिटे १६२ टक्क्यांनी महागली
प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, लखनौ आणि वाराणसीसारख्या जवळच्या शहरांतून प्रयागराजला जाणाऱ्या विमानांची तिकिटेही अनुक्रमे ४२ टक्के आणि १२७ टक्क्यांनी वाढली आहेत. यावरून महाकुंभमेळ्याकडे भाविक मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे दिसते.
४४ दिवस चालणार यंदाचा महाकुंभ मेळा
यंदाचा महाकुंभ मेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ असा तब्बल ४४ दिवस चालणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभमेळा जिल्हा असा नवा जिल्हा निर्माण केला आहे. सुमारे ६ हेक्टर परिसरामध्ये या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली असून, त्यातील ४ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, तर १९०० हेक्टर परिसरामध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.