पीटीआय, प्रयागराज

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरातून आलेल्या मोठ्या संख्येतील भाविकांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषात बुधवारी महाशिवरात्रीला त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाचा लाभ घेतला. सरकारने प्रसृत केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीपासून सकाळी १० वाजेपर्यंत ८१ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केले. १३ जानेवारीपासून सुरू झालेला आणि गेले ४५ दिवस सुरू असलेला हा धार्मिक सोहळा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर समाप्त झाला.

पौष पौर्णिमाला प्रारंभ झालेल्या या उत्सवात नागा साधूंची भव्य मिरवणूक आणि तीन अमृत स्नान झाले. सरकारने दिलेल्या आकेडवारीनुसार, यावर्षी प्रयागराज कुंभमध्ये ६५ कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले. जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कुंभमेळ्यात अखेरच्या दिवशीही देशभरातील लाखो भाविकांनी हजेरी लावली.

महाशिवरात्रीला प्रयागराजमध्ये खास उभारण्यात आलेल्या महाकुंभनगरमध्ये चहूबाजूंनी ‘हर हर महादेव’, ‘जय महाकाल’चा गजर होत होता. महाशिवरात्री हा उत्सव शिव-पार्वती यांच्या दैवी मिलनाचे प्रतीक असून कुंभमेळ्याच्या संदर्भात तिचे विशेष महत्त्व आहे.

दरम्यान, संगम, घाट परिसर आणि पाचही शिवालय परिसरात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याची माहिती पोलिस महासंचालक (कुंभ) वैभव कृष्णा यांनी दिली. दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे ४ वाजता गोरखपूर येथून वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसमवेत कुंभमेळ्यातील व्यवस्थेवर देखरेख ठेवायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘एक्स’वरून साधूसंत आणि भाविकांना पवित्र स्नानासाठी शुभेच्छा दिल्या.

हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

कुंभ काळात हेलिकॉप्टरने भाविकांवर पुष्पवृष्टी करण्याची व्यवस्था करण्यात आली. भाविकांवर पाचवेळा वीस क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. महाकुंभातील शेवटचे पवित्र स्नान असल्याने मध्यरात्रीपासूनच संगम किनारी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. काही भाविक ब्रह्म मुहूर्तावर स्नान करण्यासाठी थांबले होते, तर अनेक भाविकांनी नियोजित वेळेपूर्वीच स्नान केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh mela 2025 government claims 65 crore devotees bathed in 45 days amy