Mahakumbh Rush: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळा येत्या २६ फेब्रुवारी रोजी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केला आहे. यामुळे प्रयागराज शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या संख्येने ६० कोटींचा टप्पा ओलंडला आहे. कुंभमेळ्याला काही दिवस शिल्लक राहिले असल्याने महाशिवरात्रीच्या आधी मोठ्या प्रमाणावर भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार १३ जानेवारी रोजी सुरूवात झालेल्या कुंभमेळ्यात दररोज एक कोटींहून अधिक भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्याला हजेरी लावत आहेत. यामुळे प्रयागराज आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
प्रयागराज येथील वाहतूक कोंडीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामधून आलेल्या चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांकडून गर्दीचे नियोजन करण्यासाठी तसेच वाहानांच्या पार्किंगची सोय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाकुंभ परिसरात जाणाऱ्या शटल बसेसमध्ये यात्रेकरूंची प्रचंड गर्दी झाल्याने अनेक भाविकांना महाकुंभ परिसरात पोहोचण्यासाठी १०-१५ किलोमीटर चालावे लागले.
महाकुंभमेळ्याचे उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी पीटीआयला सांगितले की, गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांनी अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे.
महाकुंभमेळ्याच्या शेवटच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात गर्दी वाढण्याच्या अपेक्षेने पोलिसांनी रेल्वे स्थानकांभोवती सतर्कता वाढवली आहे. १३ जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्यासाठी जवळपास १३,६६७ गाड्या चालवण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली येथे रेल्वे स्थानकावरील झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकाडून काळजी घेतली जात आहे. अयोध्या धाम रेल्वे स्थानकावर बॅरिकेड्स आणि होल्डिंग एरिया तयार करण्यात आला असल्याची माहिती डीएसपी यशवंत सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. दरम्यान प्रयागराजमधील महाकुंभात पवित्र स्नान केल्यानंतर अनेक भाविकांनी राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जात आहेत. दोन्ही शहरांमध्ये फक्त १६० किलोमीटरचे अंतर असल्याने भाविक तेथे जात आहेत.