लखनऊ : महाकुंभादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनांवर विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेमुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी संतापले. विरोधी पक्षांची टीका हा महाकुंभ, सनातन धर्माचा अपमान असून तो आपण सहन करणार नाही असे ते विधानसभेत म्हणाले. महाकुंभाविषयी खोटे कथानक रचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाकुंभ हा केवळ धार्मिक मेळावा नसून तो भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, महाकुंभ सुरू झाल्यापासून त्याचे महत्त्व कमी करण्यासाठी विरोधक अपप्रचार करत आहेत असा आरोप त्यांनी केला. ‘‘काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चेंगराचेंगरीत हजारो जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला, ममता बॅनर्जींनी त्याचा उल्लेख मृत्युकुंभ असा केला, मृतदेह गंगेच्या पाण्यात फेकले जात असल्याचा जया बच्चन यांनी आरोप केला आणि हा सोहळा निरुपयोगी असल्याची टीका लालूप्रसाद यादव यांनी केली,’’ या सर्वांच्या टीकेचा उल्लेख करत योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माचे संरक्षण करण्याचा निश्चय बोलून दाखवला.