नवी दिल्ली पीटीआय

महाकुंभने देशाची एकतेची भावना बळकट झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत केले. मोठे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याच्या आमच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना कुंभच्या यशस्वी आयोजनातून उत्तर मिळाले असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

महाकुंभबाबत दीड महिना देशवासीयांमध्ये अभूतपूर्व उत्साह होता. गैरसोयीची धास्ती असतानाही कोट्यवधी भाविक एकत्र आले ही आमची ताकद आहे. आपला अहंभाव बाजूला ठेवून, देशातील कानाकोपऱ्यातील नागरिक प्रयागराज येथे एकत्र आले. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना, महाकुंभमधील हे एकतेचे दर्शन विलोभनीय असेच होते असे पंतप्रधानांनी नमूद केले.

विविध भाषा बोलणाऱ्यांनी हर हर महादेव जयघोष केला त्यातून संगमावर ‘एक भार श्रेष्ठ भारत’ याची अनुभूती अधिक भक्कम झाली. पंतप्रधानांनी महाकुंभचा धागा स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षाशी जोडला. यातून देशवासीयांचा स्वाभिमान जागृत झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

विरोधकांचा चर्चेसाठी आग्रह

पंतप्रधानांनी निवेदन केल्यावर विरोधकांनी महाकुंभबाबत चर्चेची मागणी केली. पंतप्रधानांना कोणत्या नियमान्वये बोलण्याची परवानगी देण्यात आली याची विचारणा विरोधकांनी केली. तसेच निवेदनात चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांबाबत माहिती द्यावी असा आग्रह धरला. लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव त्यांच्या मंत्रालयाबाबत निवेदन करत होते. त्यानंतर सभागृहात जलशक्ती मंत्रालयाबाबत अनुदान मागण्यांबाबत चर्चा होणार होती.

युवकही महाकुंभशी मोठ्या प्रमाणात जोडले गेले. नवी पिढी अभिमानाने श्रद्धा, वारसा तसेच परंपरा पुढे नेत आहे. – नरेंद मोदी, पंतप्रधान

लोकसभेत लोकशाही संरचनेनुसार विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी मिळायला हवी होती. मात्र ‘नव्या भारतात’ ती नाकारण्यात आली. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीत दगावलेल्यांना पंतप्रधानांनी आदरांजली व्हायला हवी होती. जे युवक कुंभला गेले, त्यांना पंतप्रधानांकडून रोजगारही हवा आहे.  राहुल गांधी, विरोधी पक्षनेते

केंद्राकडे मृतांबाबतचा तपशील नाही – गृहराज्यमंत्री

महाकुंभच्या चेंगराचेंगरीबाबत उत्तर प्रदेश सरकारने चौकशी केली. त्यातील मृत किंवा जखमींबाबतचा तपशील केंद्र सरकारकडे नाही अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. याबाबत काँग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल व किरसान नामदेव यांनी प्रश्न विचारला होता. हे राज्याचे विषय आहेत असे राय यांनी उत्तरात नमूद केले.

Story img Loader