उत्तर प्रदेशमधील निवडणुकीनंतर महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल भविष्यवाणी केलीय. महामंडलेश्वरर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी केलेल्या दाव्यानुसार ग्रह-नक्षत्रांच्या आधारे भविष्यवाणी केल्यास १२ वर्ष नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी कायम राहतील. १२ वर्ष हे पद भूषवल्यानंतर मोदी दिल्लीच्या राजकारणापासून दूर जातील असंही महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरींनी म्हटलंय. राष्ट्रवादाच्या नावाने पंतप्रधान मोदी स्वत: पद सोडतील आणि ही जबाबदारी एखाद्या योग्य व्यक्तीकडे सोपवतील, असं सूचक वक्तव्यही महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरिंनी केलंय. त्यांनी योगी आदित्यनाथ हे मोदीनंतर पंतप्रधान होतील असं सांगितलं आहे.
नक्की वाचा >> “मी ‘गुजरात फाइल्स’ बनवायला तयार, सत्य मांडणार पण तुम्ही आश्वासन द्या की…”; दिग्दर्शकाची मोदींकडे मागणी
“१२ वर्ष पद भूषवल्यानंतर मोदीजी स्वत: पद सोडतील. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवू शकतो अशा सक्षम व्यक्तीकडे मोदीजी पंतप्रधान पदाची जबाबदारी देतील. मोदी स्वत: राजकारणामधून संन्यास घेतील. या माध्यमातून ते एक आदर्श सर्वांसमोर ठेवतील ज्यामधून ते राजकीय इतिहास घडवतील,” असं महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि म्हणालेत.
नक्की वाचा >> Video: The Kashmir Files वरुन मोदींनी सुनावलं; म्हणाले, “ज्यांना वाटतं की हा चित्रपट योग्य नाही त्यांनी…”
गुजरातचे माजी मुख्यमंत्री असणारे नरेंद्र मोदी हे मे २०१४ पासून भारताचे पंतप्रधान आहेत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भारतीयांना मोदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या भाजपा आणि मित्र पक्षांच्या बाजूने कौल देत त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होण्याची संधी दिली. मात्र आता महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांच्या सांगण्यानुसार २०२४ च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान झाल्यानंतरही मोदी दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२६ मध्ये राजकीय संन्यास घेतील.
नक्की वाचा >> “काही वेळा पंतप्रधान मोदी भाषणांदरम्यान वाजपेयींसारखे वाटतात पण…”; शशी थरुर यांचा टोला
उत्तर प्रदेशमधील महोबामध्ये स्वजन शिष्य संम्मेलनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी हे भाकित वर्तवलं आहे. आमचा आशिर्वाद आहे की पंतप्रधान मोदींचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे दिल्लीची गादी संभाळतील, असंही ते यावेळी म्हणाले. योगींनी पंतप्रधान होऊन हिंदू राष्ट्रवादाचं स्वप्न पूर्ण करावं, अशी इच्छाही महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी बोलून दाखवली. सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकून योगींनी ऐतिहासिक कामगिरी केलीय. भविष्यामध्ये योगी हेच पंतप्रधान होतील अशी चर्चा आता दबक्या आवाजामध्ये भाजपा कार्यकर्त्यांमध्येच सुरु झालीय.
महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी मुनव्वर राना यांच्यावर निशाणा साधताना, “अशा मानसिकतेचे लोक भारतावरील ओझं आहेत,” असा टोला लगावला. “भारत आमच्या बापाचा आहे. मुनव्वर रानाच्या बापाबद्दल आम्हाला ठाऊक नाही. ते इथले आहेत की इतर कुठले याची माहिती नाही. ज्या देशाबद्दल यांच्या मनामध्ये द्वेष आहे तिथं राहण्याचा यांना अधिकार आहे. असे लोक तलावामधील सडलेल्या माशांप्रमाणे असतात,” अशा शब्दांमध्ये महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरि यांनी नाराजी व्यक्त केली.