Arvind Singh Mewar Dies: मेवाडच्या राजघराण्याचे सदस्य आणि एचआरएच हॉटेल समूहाचे अध्यक्ष अरविंद सिंह मेवाड यांचे दीर्घ आजारामुळे उदयपूर येथे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचे ते वंशज होते. उदयपूर येथील सिटी पॅलेसमधील शंभू निवासात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी विजयराज कुमारी, मुलगा लक्ष्यराज सिंह मेवाड, मुलगी भार्गवी कुमारी मेवाड आणि पद्मजा कुमारी परमार असा परिवार आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

अरविंद सिंह मेवाड हे भगवंत सिंह मेवाड आणि सुशीला कुमारी यांचे कनिष्ठ सुपुत्र होते. त्यांचे मोठे बंधू महेंद्र सिंह मेवाड यांचे मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधन झाले होते. अजमेरच्या मेयो महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली. तसेच विविध आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले होते.

एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सची त्यांनी स्थापना केली होती. त्याआधी त्यांनी बरीच वर्ष शिकागो येथे राहून काम केले. मेवाड यांना क्रिकेट, पोलो आणि संगीतामध्ये ऋची होती. त्यांनी राजस्थानच्या रणजी क्रिकेट संघाचे कर्णधारपदही भूषविले होते. तब्बल दोन दशक त्यांनी क्रिकेटपटू म्हणून मैदान गाजवले.

तसेच १९७० च्या दशकात त्यांनी पोलो या क्रीडा प्रकारतही चमक दाखवली होती. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना हा खेळ सोडावा लागला. इंग्लंडमधील पोलो क्लबच्या धर्तीवर त्यांनी उदयपूर येथे मेवाड पोलोची स्थापना केली होती. या पोलो संघात व्यावसायिक खेळाडू त्यांनी तयार केले होते. या खेळाडूंनी नंतर भारताचेही विविध स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले.

किती संपत्ती मागे सोडली?

अरविंद सिंह मेवाड आणि त्यांचे मोठे बंधू महेंद्र सिंह मेवाड यांच्यात जवळपास ७० वर्षांपासून संपत्तीचा वाद सुरू आहे. १९५५ साली जेव्हा भगवंत सिंह मेवाड हे महाराणा बनले, तेव्हापासून संपत्तीचा वाद सुरू झाला होता. भगवंत सिंह मेवाड यांनी वारशात मिळालेली संपत्ती विकण्यास आणि भाडेतत्त्वावर देण्यास सुरुवात केल्यानंतर महेंद्र सिंह मेवाड यांना हा निर्णय रुचला नाही. वडिलांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांनी खटला दाखल केला.

माध्यमातील बातम्यांनुसार मेवाड घराण्याची एकूण संपत्ती १० हजार कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते.

Story img Loader