महाविकास आघाडीतील वाद विकोपाला; विदर्भातील १२ जागांवर तडजोडीस काँग्रेस ठाकरे गटाचा नकार

महाविकास आघाडीमध्ये १५ जागांचा तिढा सुटलेला नाही. यातील १२ जागा प्रामुख्याने विदर्भातील असून त्यावर तडजोड करण्यास काँग्रेस व ठाकरे गटाने ठाम नकार दिला आहे.

maharashtra assembly election 2024 dispute in maha vikas aghadi on 12 seats in vidarbha
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा वाद रविवारी विकोपाला गेला. पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी दिल्लीत काँग्रेस आणि मुंबईत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांना धावधाव करावी लागली. काँग्रेस अध्यक्ष मल्किकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची तातडीने बैठक बोलावण्यात आली. या घडामोडींमुळे काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही रद्द करावी लागली.

महाविकास आघाडीमध्ये १५ जागांचा तिढा सुटलेला नाही. यातील १२ जागा प्रामुख्याने विदर्भातील असून त्यावर तडजोड करण्यास काँग्रेस व ठाकरे गटाने ठाम नकार दिला आहे. मुंबईत शनिवारी महाविकास आघाडीतील तीनही नेत्यांची मॅरेथॉन बैठक होऊनही सहमती होऊ शकली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांनी रविवारी बैठक घेऊन तुटेपर्यंत ताणू नका असा इशारा एकमेकांना दिला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेसच्या नेत्यांशी फोनवरून संवाद साधल्याचे समजते.

या मध्यस्थीनंतर महाविकास आघाडीतील वाद मिटला असल्याने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची घोषणा केली जाईल, असे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले होते. मात्र, काँग्रेसचे सर्व नेते दिल्लीत असल्याने ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता नसल्याचे समजते. काँग्रेसच्या सुमारे ६०हून अधिक उमेदवारांची पहिला यादी रविवारी रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता होती. उमेदवारांच्या निश्चितीसाठी दिल्लीमध्ये सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही आयोजित करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीतील पेचामुळे ही बैठक रद्द करण्यात आली असून आता सोमवारी ही बैठक होणार असल्याचे समजते. खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, सुनील केदार आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा >>> Yahya Sinwar : याह्या सिनवार बोगद्यात लपला होता, तर पत्नीकडे दिसली २७ लाखांची बॅग; इस्रायलकडून Video शेअर

वादातील मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीवेळी ठाकरे गटाने आपल्या वाट्याचे रामटेक व अमरावती हे दोन मतदारसंघ काँग्रेसला दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने विदर्भात अधिक जागांची मागणी केली आहे. आरमोरी, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर, रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, अहेरी, भद्रावती वरोरा या मतदारसंघांवर काँग्रेस व ठाकरे गटाने दावा केला आहे. यापैकी अहेरी व चंद्रपूर मतदारसंघांवर राष्ट्रवादी-शरद पवार गटानेही दावा केला असल्याचे समजते. या १२ पैकी एकही मतदारसंघ महाविकास आघाडीकडे नाही. तेथे भाजप किंवा अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

माजी आमदार कपिल पाटील काँग्रेसमध्ये

समाजवादी गणराज्य पक्ष विलीन करत माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पाटील यांनी दिल्लीत रविवारी खरगेंची भेट घेतली. राहुल गांधी फॅसिझमविरोधात लढत असून त्यांना ताकद देण्यासाठी काँग्रेसमध्ये जाण्याची निर्णय घेतल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 dispute in maha vikas aghadi on 12 seats in vidarbha zws

First published on: 21-10-2024 at 04:44 IST
Show comments