डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन हा करोनाचा नवा विषाणू तिपटीने अधिक संसर्गजन्य असल्याने केंद्र सरकार दक्ष झाले आहे. करोनासंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी तसेच आरोग्य सुविधांच्या सुसज्जतेच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठकही बोलावली आहे. या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या बैठकीच्या आधीच मोदी सरकार सध्या राज्यांसोबत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत. इतकच नाही तर केंद्र सरकार ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी महाराष्ट्रच्या विधनासभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात करोना परिस्थितीचा संदर्भ देताना दिलेत.

नक्की काय घडलं?
झालं असं की, अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकावणाऱ्याला कर्नाटकमधून अटक करण्यात आल्याच्या मुद्द्यावरील चर्चा झाल्यानंतर अजित पवार त्यांच्या आसनावरुन उठले आणि पिठासीन अध्यक्ष नरहरी शिरवळ यांच्या परवानगीने बोलू लागले. “आपल्यामार्फत मला सभागृहाचं लक्ष एका विषयाकडे वेधायचं आहे. कालपासून अधिवेशन सुरु झालं आज दुसरा दिवस आहे. आपण तीन, चार, पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननिय सदस्य करतायत. काही ठराविक सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही,” असं म्हणत अजित पवार यांनी मास्क न घालणाऱ्या सदस्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

केंद्र मोठ्या निर्णयाच्या तयारीत असल्याचे संकेत…
याचसंदर्भात बोलताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला. हा उल्लेख करतानाच त्यांनी केंद्र सरकार सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाईट लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याचं म्हटलंय. “स्वत: देशाचे पंतप्रधान देखील जे काय सध्या करोनाच्यासंदर्भातील संकट आहे त्याबद्दल गांभीर्याने विचार करतायत. त्यामध्ये रात्री लॉकडाउन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देश पातळीवर सुरु आहे,” असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “मी स्वतः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याशी बोलेन पण…”; फडणवीसांनी सभागृहात दिला शब्द

परदेशातील संदर्भही दिला…
अजित पवार यांनी परदेशातील परिस्थितीचा संदर्भाही दिला. “एवढी वाईट परिस्थिती आहे ज्याचा अंदाज नाहीय अध्यक्ष मोहोदय आपल्याला. परदेशात दिड दिवसाला दुप्पट रुग्णसंख्या होत चाललीय. जागतिक आरोग्य संघटनेनं परदेशामध्ये पाच लाख लोक मृत्यूमुखी पडतील असं सांगितलं आहे. हे झालं परदेशाचं आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं काय?,” असा प्रश्न मास्क न घालणाऱ्या विधानसभा सदस्यांना अजित पवारांनी विचारला.

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, दिल्लीत
देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दोनशेहून जास्त झाली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आढळले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ५४ तर दिल्लीमध्ये ५७ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीमध्ये करोनाच्या प्रत्येक नमुना चाचणीचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

नक्की वाचा >> अनिल परब विरुद्ध नितेश राणे… जागेवरुन विधानसभेच्या सभागृहात वाद, फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी

…म्हणून बोलावली आज बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळी आणि अन्य सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये करोनासंदर्भातील आढावा बैठक घेतली होती. मात्र गुरुवारी होणाऱ्या बैठकीमध्ये ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीने प्राणवायूचा पुरवठा, औषधोपचार आदी सुविधांची  किती तयारी करावी लागेल, या दोन्ही कळीच्या मुद्दय़ावर चर्चा  केली जाणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील आपत्तीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोदींनी आढावा बैठक बोलावली असल्याचे सांगितले  जाते.

Story img Loader